‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ हे सुमती लांडे यांनी संपादित केलेलं पुस्तक शब्दालय प्रकाशननं प्रकाशित केलं आहे. वाङ्मयीन चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक फार उपयोगाचं आहे. १९९४ च्या ‘शब्दालय’ दिवाळी अंक ‘वाङ्मयीन चळवळी’ हा विषय केंद्रस्थानी घेऊन प्रकाशित करण्यात आला. या दिवाळी अंकातील निवडक लेखांसह काही नवे लेख घेऊन ‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ हे पुस्तक संपादित करण्यात आलं आहे.
या पुस्तकात चार विभाग आहेत. पहिला विभाग ‘वाङ्मयीन चळवळी’ हा आहे. या विभागात डॉ. नागनाथ कोतापल्ले, दया पवार, राजा ढाले, रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशीव, फ.म. शहािजदे, फादर कोरिया, डॉ. किशोर सानप, डॉ. अश्विनी धोंडगे, डॉ. सुभाष सावरकर, इंद्रजित भालेराव, डॉ. र.वा. मंचरकर यांचे वाङ्मयीन चळवळींच्या संदर्भातील लेख आहे. १९६० नंतरच्या साहित्य चळवळींचे मूलस्रोत या लेखात डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी वाङ्मयीन चळवळींच्या निर्मितीचा शोध घेत या चळवळीच्या कार्याची मीमांसा केली आहे. दया पवार यांच्या लेखात दलित साहित्य चळवळीचा आढावा घेतला आहे. ‘फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य’ या लेखात राजा ढाले यांनी फुले-आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याची मीमांसा केली आहे. रा.रं.बराडे यांनी ग्रामीण साहित्य चळवळीचा आढावा घेतला आहे. भास्कर चंदनशीव यांनी ‘ग्रामीणत्वाचे नवे आयाम’ या लेखात ग्रामीण आणि ग्रामिणत्व या संकल्पना संदर्भातील नवे अन्वयार्थ विशद केले आहेत. फ.म. शहाजिंदे यांनी मुस्लिम मराठी साहित्य व चळवळी संदर्भात अनेक नवे दृष्टिकोन मांडले आहेत, तर फादर कोरिया यांनी ख्रिस्ती साहित्य चळवळीचा आढावा घेतला आहे. लघुअनियतकालिकांच्या चळवळची सामाजिक पाश्र्वभूमी व या चळवळींचा आलेख डॉ. किशोर सानप यांनी कथन केला आहे. स्त्रीवादी साहित्य चळवळीच्या यशापयशाची मीमांसा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी केली आहे. मराठी जनसाहित्याच्या चळवळीची भूमिका, विचार, या चळवळीतील मराठी वाङ्मय, जनसाहित्याची संकल्पना, समीक्षाविचार, साहित्यनिर्मिती आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात जनसाहित्य असा अभ्यासपूर्ण व सविस्तर आढावा डॉ. सुभाष सावरकर यांनी घेतला आहे.
प्रा. इंद्रजित भालेराव यांनी महानुभावांचे वर्तमान साहित्यात कसे नाही, ते विशद केले आहे, तर डॉ. र.बा.मंचरकर यांनी नव्या वाङ्मयीन प्रवाहाचा आढावा घेतला आहे. विविध वाङ्मयीन चळवळींचे स्वरूप आणि त्यांच्या स्थितीगतीचा आलेख या विभागातील लेखातून कळतो.
‘वाङ्मयीन दृष्टिकोन’ या दुसऱ्या विभागात चार महत्त्वाचे लेख आहेत. ‘आपले वाङ्मयीन संचित आणि आपले साहित्य या’ रंगनाथ पठारे यांच्या लेखात आपल्या भाषिक संस्कृतीचे पर्यावरणाचे वाङ्मयाशी अनुबंध कसे आहेत, कसे नाहीत, कसे असावेत, कसे नसावेत, याची चिकित्सा केली आहे. डॉ. रावसाहेब कसबे यांनी वाङ्मयनिर्मिती आणि वाङ्मयीन चळवळींच्या अनुबंधाचे नवे अन्वयार्थ विशद केले आहे. साहित्यातील देशीयतेच्या संदर्भातील भालचंद्र नेमाडे यांच्या दृष्टिकोनाविषयीची साधक बाधक चर्चा वासुदेव सावंत यांनी केली आहे. भालचंद्र नेमाडे आणि रंगनाथ पठारे यांनी ग्रामीण साहित्य संकल्पनेच्या मर्यादा ओलांडून साहित्याच्या वर्गीकरणाला कसे आव्हान दिले आहे याविषयीची चर्चा चिकित्सा डॉ. अविनाश सप्रे यांनी केली आहे.
‘वाङ्मयीन चळवळी: मते मतांतरे’ या विभागात राजन गवस, नामदेवराव देसाई, म.द. हातकणंगलेकर, डी.बी. जगत्पुरीया, प्रतिमा इंगोले यांनी विविध वाङ्मयीन चळवळींच्या यशापयशाचा सवत्यासुभ्यांचा आढावा घेणारे, साहित्य चळवळीशी आपले अनुबंध विशद करणारे लेखन केले आहे.
या पुस्तकाच्या चौथ्या विभागात वसंत पळशीकर यांच्याशी रंगनाथ पठारे व सुमती लांडे यांनी वाङ्मयीन चळवळींच्या संदर्भात केलेला संवाद आहे. वाङ्मयीन चळवळ म्हणजे काय? तिच्या निर्मितीप्रेरणा, तिचे अवस्थांतर, चळवळींची गरज, तिच्यातील गट, तिचे हेतू, चळवळीचे साहित्य, आदी अनेक विषयांवर वसंत पळशीकरांनी विचारमंथन केले आहे.
वाङ्मयीन व्यवहार व वाङ्मयीन चळवळींच्या संदर्भातील गंभीर चर्चा, चिकित्सा करणारे लेखन या पुस्तकात आहे. वाह्मयीन चळवळीचा इतिहास, प्रेरणा, प्रवृत्ती, यशापयश, आवश्यकता, परिणाम आदी अनेक गोष्टींचा तपशीलवार आढावा, तटस्थ मूल्यमापन या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक चळवळीच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या नव्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत. अशी पुस्तके महाविद्यालयांसह सर्वच ग्रंथालयातही असावीत.
वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन
संपादन : सुमती लांडे, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
वाङ्मयीन चळवळी: चर्चा आणि चिकित्सा
‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ हे सुमती लांडे यांनी संपादित केलेलं पुस्तक शब्दालय प्रकाशननं प्रकाशित केलं आहे. वाङ्मयीन चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक फार उपयोगाचं आहे. १९९४ च्या ‘शब्दालय’ दिवाळी अंक ‘वाङ्मयीन चळवळी’ हा विषय केंद्रस्थानी घेऊन प्रकाशित करण्यात आला.

First published on: 25-11-2012 at 01:48 IST
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidharbrang book of smruti lande