सलग दोन वर्ष पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. भविष्यात हा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून गावे ‘पाणी’दार बनविण्यासाठी आता विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नोगरगोजे यांनी दिली.
जिल्ह्य़ात यावर्षी सरासरीच्या सुमारे ५० टक्के, तर मागील वर्षी सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातच पाण्याचा प्रचंड उपसा, अयोग्य सिंचन पद्धती व जास्त पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाची लागवड यामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली. टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांतच मोठय़ा प्रमाणात उसाची लागवड झाल्याचे दिसते. हा विरोधाभास जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलैपर्यंत संरक्षित करण्याच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची मोहीम जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी हाती घेतली आहे.
जिल्ह्य़ात उपलब्ध पाणी कमी नाही. पाणी वापराच्या पद्धतीत अनेक चुका आहेत. आजही पारंपरिक प्रवाही सिंचनाला शेतकरी प्राधान्य देतात. मुळात ही सिंचन पद्धत अयोग्य असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. जलस्त्रोत संरक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करायला हवा. मात्र, जिल्ह्य़ात सुमारे ५ टक्क्य़ांहून कमी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. पाच एकर उसासाठी लागते ते पाणी अडीच हजार लोकसंख्येच्या वस्तीला पिण्यासाठी वर्षभर पुरेसे ठरते, हे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्यात आले.
 नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार परिसरात यंदा केवळ २२५ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, येथे पाणीटंचाई अजिबात नाही. याउलट आपल्याकडे यावर्षी ३५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊनही पाण्याची भीषण समस्या आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनतेने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केला नाही, तर ही समस्या अधिक भीषण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून पिकासाठी कमी वापर व प्रवाही सिंचन न करण्याबाबत मार्गदर्शनही ग्रामसभेच्या माध्यमातून केले जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी १० डिसेंबरपूर्वी या विशेष ग्रामसभा घेऊन आपापल्या परिसरातील पाण्याचे नियोजन करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.     
जलसाक्षरता अभाव
जिल्ह्य़ात जलसाक्षरतेच्या अनुषंगाने एकही गाव आदर्श नाही. गावांना स्वत:च्या जलसाठय़ांचे वर्षभरासाठी नियोजन करता यावे, या साठी काही गावांची निवड केली जाणार आहे. विशेष ग्रामसभांनंतर ज्या गावांत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, तेथे हिवरेबाजार गावाच्या धर्तीवर लोकसहभागातून काम करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आपले पाणी जपून ठेवा
आपल्या गावातील सार्वजनिक व खासगी पाण्याचे स्त्रोत कधीपर्यंत टिकतील, याचे नियोजन नि अंमलबजावणी ग्रामपंचायतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्याचा ठराव घ्यावा. गावच्या सीमेमधील पाणी गावासाठीच संरक्षित करावे. ज्या गावांना असे नियोजन करता येणार नाही, त्यांना इतर गावांच्या सीमेत जाऊन पाणी उपलब्ध करून घ्यावे लागेल. त्यावेळी पाणी उपलब्धतेबाबत शाश्वती देता येणार नाही, म्हणून सुयोग्य नियोजन करून आपले पाणी जपून ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.