दोन दिवसांपूर्वी पेट्रोलपंप, तसेच दरोडय़ातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या ‘एडीएस’ने (दरोडा प्रतिबंधक पथक) दोन पर्स चोरणाऱ्या कुख्यात महिलांना ताब्यात घेतले. या दोघींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोडा व बॅग लंपास करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी नांदेड शहरालगत असलेल्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे ४० हजारांची लूट केली. भाग्यनगर पोलिसांना या गुन्ह्य़ाची उकल करण्यात अपयश आले असले, तरी ‘एडीएस’ने राजू हनुमंत पवार (येवती, तालुका मुखेड) व पाखरू सीताराम गोरे (खोपोली, सध्या खोब्रागडेनगर, नांदेड) या दोघांना अटक केली. त्यांच्या अटकेने सुमारे ६ ते ७ गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांना अटक करताना दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या चौघांना ‘एडीएस’ने बुधवारी अटक केली होती.
‘एडीएस’चे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. धुन्न्ो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्हेगारांना पकडण्याची ‘हॅट्ट्रीक’ साधताना पर्स पळवणाऱ्या दोन महिलांना अटक केली. गवळण सोमपल्ले व अनिता हातोळे अशी या महिलांची नावे आहेत. या दोघींनी ६ ते ७ गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या दोघींकडून किती रुपयांचा ऐवज जप्त झाला, हे समजू शकले नाही. नांदेड शहरातल्या चोरी-दरोडय़ाच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर शहरातल्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासीनता समोर आली होती. ‘एडीएस’ने बजावलेल्या या कामगिरीने दिलासा मिळाला आहे.