महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा निर्विवाद मताधिक्याने विजयी झालेले युवानेते शिवराज मोरे यांचे कर्मभूमी कराडमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातून शिवराज मोरे यांची दिमाखदार मिरवणूक काढली.
फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत शहर परिसरासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवराज मोरे यांनी शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांची जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. मिरवणूक दत्त चौकात येताच तेथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक थेट आझाद चौकात आली. तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. तेथून पायी चालत मिरवणूक ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाकडे गेली. तेथे अभिवादन केल्यानंतर मिरवणूक शिवराज मोरे यांच्या घराकडे वळवण्यात आली. तेथे त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नागपूर, औरंगाबाद, नगर, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा सहा विभागातून मतदान झाले. त्यात सुमारे ८ हजार मतदारांनी हक्क बजावला. त्यात शिवराज मोरे यांना ४ हजार ८६ मते मिळाली. विरोधी उमेदवार अजितसिंह यांना ३ हजार ३५ मते मिळाली. त्यांची मतमोजणी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर झाली. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या धोरणानुसार एनएसयूआय पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक  पार पडली. यापूर्वी २०१० मधील विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवराज मोरे यांनी महेश गणगणे यांचा पराभव करत विजय मिळविला होता. यंदा सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजय पटकवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये  कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
 .