कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी सकाळपासून धरणातील  पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढविण्यात आला आहे.  सांगलीतील आयर्वनि पुलाची पाणी पातळी संध्याकाळपर्यंत २४ फूट ९ इंचांवर पोहोचली असून शहराच्या विस्तारीत भागातील जामवाडी, काकानगर, कर्नाळरोड आदी भागात महापालिकेने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून कोयना, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत आहे. धरणातील पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातील विसर्ग दुपटीने वाढविला आहे. कोयना धरणातून प्रतिसेकंद ४९ हजार ८२७ क्युसेक्स तर चांदोली धरणातून १७ हजार ८३३ आणि कण्हेर धरणातून १९३१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. वारणा नदी पात्राबाहेर पडली असून काठावरील पिकांमध्ये पाणी शिरले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या आठ तासात सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे १२५ मि.मी. झाली असून कोयना व चांदोली येथे ४७ मि.मी. आणि महाबळेश्वर येथे ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
कृष्णा व वारणा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने व पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु असल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. सायंकाळी सांगलीतील आयर्वनि पुलानजीक पाणीपातळी २४ फूट ९ इंच होती. ज्यादा सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे रात्रीमध्ये या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. आयर्वनि पुलानजीक ३० फूट पाणी पातळी झाली, तर शहरातील विस्तारित भागात जामवाडी,काकानगर, कर्नाळ रोड या ठिकाणी वसाहतीत पाणी शिरले.
महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवला असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांच्या स्थलांतरासाठी व निवासासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिका सूत्राकडून सांगण्यात आले.