नवी दिल्ली येथे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली. त्यात लाखोळी डाळीचा जेवणात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला शांतीलाल कोठारी यांच्या लाखोळी डाळीच्या लढय़ाला आता अखेर यश आले.
परिषदेचे महानिर्देशक तसेच केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. व्ही.एम. कटोच हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी योजना आयोगाचे कृषी सल्लागार डॉ. जे.पी. मिश्रा, मेडिकल कॉलेजचे डॉ. यू.पी. मिश्रा, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉ. एम.व्ही, पद्मा, चंदीगडचे डॉ. एल. प्रभाकर तसेच अ‍ॅकडमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी या बैठकीला उपस्थित होते.
जर वैज्ञानिकांच्या मतांची दखल घेऊन सरकारने कारवाई केली तर देशाला डाळीची कमतरता भासणार नाही. शिवाय महागडय़ा डाळीच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल, या बैठकीत काढण्यात आलेल्या निष्कषांवर डॉ. शांतीलाल कोठारी यांनी समाधान व्यक्त केले.
लाखोळी डाळीच्या वापराला हिरवी झेंडी मिळाल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला असून लाखोळी डाळीचे भरपूर उत्पादन घेऊन देशातील डाळींची समस्या सोडविण्यास मदत करावी, असे आवाहन डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केले. मागील २० वर्षांपासून शेतकरी आणि ग्राहक यांच्या चर्चा व अध्ययन यावर आधारित अ‍ॅकेडमीच्या वतीने बाजू मांडण्यात आली.
डॉ. अर्जुन खंडारे यांनी गोंदिया जिल्ह्य़ातील घरोघरी जाऊन तयार केलेला अहवाल बैठकीत सादर केला. सोयाबीन व मोहफुले याच्या मनुष्य आहारातील उपयोगावर या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय पोषण संस्थेने शंका व निरसनासाठी अध्ययनाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. भारत कृषक समाजाचे नारायण ओलेपाटील  व ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून युवा ग्रामीण प्रागतिक मंडळाचे सचिव   अनिल  बोरकर उपस्थित होते.