प्रवरेच्या नदीपात्रात अकोले व संगमनेर तालुक्यात २९ प्रोफाईल वॉल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निळवंडे धरण प्रकल्पाच्या निधीतून ४१ कोटी ३३ लाख रुपये कर्च करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरण ते संगमनेर तालुक्यातील ओझर पिकअपवेअरपर्यंत नदीपात्राचे अंतर ५०.७ किलोमीटर असून या अंतरात २९ प्रोफाईल वॉल बांधण्याचे प्रस्तावित आहे. अकोले तालुक्यात १६ आणि संगमनेर तालुक्यात १३ प्रोफाईल वॉल असे नियोजन आहे. या प्रस्तावाला धोरणात्मक मान्यता मिळालेली नसतानाही या प्रोफाईल वॉलच्या प्रश्नावरून राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. नियोजित प्रोफाईल वॉलच्या कामासाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने निळवंडे धरण प्रकल्पातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून ‘लोकसत्ता’ला मिळाली.
निळवंडे धरण व कालव्यासाठी मुळातच निधीची कमतरता आहे. त्यामुळेच धरणाचे काम धिम्या गतीने तर निळवंडे कालव्याची कामे ठप्प आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही निळवंडे धरण व कालव्यासाठी भरीव आर्थिक तरतूद नाही. त्यातच आता प्रोफाईल वॉलसाठी ४१ कोटी ३३ लाख रुपये देण्याचा डाव आखण्यात आल्याने निळवंडेच्या लाभक्षेत्रातील जिरायत शेतक-यांमध्ये असंतोष तयार होण्याची शक्यता आहे.
संगमनेर-अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्राची वाळू उपसामुळे झालेली झीज व या दोन तालुक्यांतील प्रवरा नदीपात्रातील उपसा सिंचन योजनांना पूर्ण क्षमतेने पाणी उचलता येत नाही. नदीपात्राची झालेली झीज भरून काढणे व उपसा सिंचन योजनांना पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्याच्या उद्देशाने प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल बांधण्याचा प्रस्ताव आहे.
प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल झाल्यानंतर पाण्याचे साठवण होणारे नाही असे वरकरणी भासवले जात असले तरी प्रत्याक्षात या २९ प्रोफाईल वॉल मध्ये ३०० दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्राच्या भूगर्भात अडविले जाणार असल्याने भंडारदरा धरणाच्या झालेल्या समन्यायी पाणीवाटपात बिघाड होण्याची शक्यताही व्यक्त होते. ओझर पिकअप वेअपर्यंत प्रवरा नदीपात्र खोल गेल्याने नदीपात्रातील उपसा सिंचन योजनांना पूर्ण क्षमतेने पाणी उचलता येत नाही, असे कारण देण्यात आले असले तरी उपसा सिंचन योजनांचे पाईप काही मीटरपर्यंत खोल झालेल्या नदीपात्रात सोडणे शक्य आहे. परंतु तसे न होता त्यासाठी प्रोफाईल वॉलची गरज असल्याचे भासविण्यात येते आहे. वॉलच्या माध्यमातून निळवंडे धरण ते ओझपर्यंतच्या उपसा सिंचन योजना बारमाही सुरू ठेवण्याचा या मागचा मूळ उद्देश असल्याची शंकाही आता व्यक्त होऊ लागली आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When fund for profile wall of nilwande project