अतिमद्यप्राशन व जेवणातून झालेल्या विषबाधेने दोघांचा मृत्यू तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम भुराटोला येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मेसाराम रतिराम उईक (५८) व चतलाल हरिचंद भंडारी (३५, रा. भुराटोला, ता. तिरोडा) अशी मृतांची, तर महिपाल टेंभरे (४२) असे गंभीर असलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी ग्राम भुराटोला येथील मयाराम उईके यांनी आपल्या घरी चेपलाल व मयपाल या दोधा मित्रांना जेवणाकरिता आमंत्रित केले होते. तिघांनी जेवणापूर्वी अतिमद्यप्राशन केले व नंतर जेवण केले. जेवणानंतर दुपारच्या सुमारास या तिघांची प्रकृती बिघडली. पोट दुखण्यास सुरुवात झाल्यावर त्यांना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात त्यांची स्थिती अत्याधिक खालावली व अखेर सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यानच मेसाराम रतिराम उईक व चेपलाल हरिचंद मंडारी यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबतच दाखल झालेल्या मयपाल टेंभरे याची प्रकृती अत्याधिक गंभीर असल्याने त्याला गोंदियातील के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे ग्राम भुराटोला येथे हळहळ व्यक्त केला जात असून त्यांना अन्नातूनच विषबाधा झाली असल्याची चर्चा गावात केली जात आहे. तिरोडा पोलिसांनी दोधांच्या मृत्यूचे प्रकरण दाखल केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बरैयया करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wine alchohol wood poison