मुंबईत गेल्या काही काळातील महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांच्या कपडय़ांविषयी भाष्य करताना ‘महिलांनीही जरा जपून कपडे घालावेत’ असा अप्रत्यक्ष सल्ला दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. मुलीने वा महिलेने कसे कपडे घातले आहेत यावर बलात्कार होण्याची शक्यता अवलंबून नसते, समाजकंटकांवर जरब बसवण्याऐवजी पोलिसांनी असले उपदेश करू नयेत, आपली जबाबदारी पार पाडावी, असे खडे बोल महिलांनी सुनावले आहेत.
मद्यधुंद तरुणीवर पवईत झालेला बलात्कार आणि इस्थर अनुया खून प्रकरणाच्या निमित्ताने गेल्या काही काळातील महिला अत्याचारांचा वेध आणि मुंबईत वावरताना सुरक्षिततेसाठी एक नागरिक म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत ‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात या घटनांचा तपास करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनांमागील कारणमीमांसा स्पष्ट करताना महिलांचे तोकडे कपडे, विशिष्ट वर्गातील लोकांसमोर वावरताना तोकडे कपडे घालणे अशा मुद्दय़ांवर भाष्य केले. त्यात ‘महिलांच्या तोकडय़ा कपडय़ांमुळे अशी मंडळी उत्तेजित होतात. तसे या आरोपींच्या जबाबातून पुढे आले आहे’ अशा आशयाचे विधान होते. त्यावरून चांगलीच तिखट प्रतिक्रिया उमटली.
बलात्कारासाठी मुलींचे तोकडे कपडे हे एकमेव कारण आहे का?, असा सवाल स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यां ज्योती म्हापसेकर यांनी उपस्थित केला. बलात्कार हे फक्त तोकडे कपडे घालणे या एकाच कारणामुळे होतात का? ऐंशी टक्के  बलात्कार हे परिचितांकडून, आप्तांकडून होतात तेव्हा त्यांच्या पेहरावाचा काय संबंध असतो?, असे परखड बोल सुनावत सहा महिन्यांच्या मुलीपासून ते अगदी बुरखाधारी स्त्रियांवरही बलात्कार केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलींनी किंवा स्त्रियांनी तोकडे कपडे घातले आहेत की अंगभर कपडे घातले आहेत, यावर बलात्कार होणार की नाही हे अवलंबून नसते. कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.
स्त्री असो वा पुरूष, तारतम्य दोघांनीही बाळगले पाहिजे. मुळातच, दुसऱ्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या अंगाला हात लावू नये एवढी साधी गोष्ट आपल्याला कशी कळत नाही. पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यांना कायद्याची जरब नाही. बलात्कारांच्या घटनांमध्ये शिक्षा होत नाही. अनेकदा तर नोंदही होत नाही. मग त्यांना भीती वाटणार कशी? यासाठी पोलिसांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे, असे म्हापसेकर यांनी नमूद केले.
तर पुरुषांना त्यांच्या कामवासनेवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि बायकांच्या कृतीने ती उद्दिपीत होते, हे पूर्वापार समाजमनावर ठसवले जात आहे. बायकांचे कपडे, वागणे, बोलणे, चालणे सर्व मर्यादेत हवे. पुरुषांच्या शारीरिक वासना नैसर्गिक आहेत. मात्र बायकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, हा कसला न्याय? असा जाब सामाजिक कार्यकर्त्यां स्नेहा खांडेकर यांनी विचारला. समाजात एकत्र वावरताना पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. कोणत्याही अकस्मात घटनेपासून सुरक्षित राहण्यासाठी दोघांनीही काळजी घ्यायला हवी. प्रत्येक वेळी बायकांनी कोणती काळजी घ्यावी हे सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.