समाजाने महिलांप्रती असणारा दृष्टीकोण बदलणे, तसेच महिलांनाही त्यांच्यासाठी असणारे कायदे देखील समजून घेणे आवश्यक आहे. मदतीच्या अपेक्षेने आलेल्या महिलांना आधार वाटेल, असे पोलिसांनी वागावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष वर्षां वनारे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली.
पोलीस मुख्यालयातल्या प्रभा भवनात ‘महिलांवरील अत्याचार  आणि महिलांबाबतचे कायदे’ या विषयावर गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन  वर्षां वनारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमावेळी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी हे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्याम दिघावकर, बुलढाणा सिटीजन फोरमचे डॉ. गजानन पडघान, तसेच अॅड. रंजना पाटील, अॅड. भावना नलावडे, अप्पर पोलीस अधीक्षक नम्रता पाटील, पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव आदींची उपस्थिती होती.
१९६१ साली २ जानेवारीला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान केला होता. यानिमित्त पोलीस स्थापना दिवसाचा हा कार्यक्रम २ ते ८ जानेवारी दरम्यान घेतला जात आहे, असे पोलीस अधीक्षक दिघावकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. महिलांचे समाजातील स्थान आता बदलले आहे. त्यांच्यासाठी कायदेही आहेत, मात्र त्याचे समाजात पालन होतांना दिसत नाही. समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक ढाकणे व ताठे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन एडेड हायस्कूलच्या अंजली परांजपे यांनी केले.