जागतिक महिला दिन साजरा करणे ही केवळ एक औपचारिकता होत आहे. आज महिला अजिबात सुरक्षित नाहीत. महिलांना न्याय व सुरक्षितता हवी आहे, अशी प्रतिक्रिया नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती नंदा लोहबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. महिला व बाल कल्याणाच्या विविध योजना नागपूर जिल्हा परिषद राबवित आहे. अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. महिलांच्या स्वसुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वीच महिलांना कराटे प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला. नोकरी व विविध कामांसाठी महिला घराबाहेर पडतात, पण महिलांना अजूनही पुरेसे स्वातंत्र्य नाही. आज मुली घर व शाळेमध्येही सुरक्षित राहिलेल्या नाहीत, एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचार टाळण्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पुरुषांनाही प्रशिक्षण द्यायला हवे. अत्याचार पीडितांना मानसिक आधाराची गरज असते. यासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही सहकार्य करायला हवे. महिलांना न्याय व सुरक्षितता जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत जागतिक महिला दिन साजरा करण्याला काही अर्थ नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.