‘स्त्री-पुरुष समानता व महिला सुरक्षितता’वर कार्यशाळा
तरुणाई हीच देशाची शक्ती आहे, परंतु तिला योग्य दिशने वळविणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून नवीन आव्हाने स्वीकारायला हवी तरच आपण स्वप्नातील भारत निर्माण करू शकू, असे विचार आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी व्यक्त केले.
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ‘स्त्री-पुरुष समानता व महिला सुरक्षितता’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन तायवाडे होते. महाविद्यालयाने ‘जागर जाणिवांचा’ अभियानांतर्गत पथनाटय़, चर्चासत्र, कविता सादरीकरण, समाज जागृतीसाठी प्रभात फेरी, भित्तीपत्र आणि घोषवाक्य स्पर्धा, स्त्री भ्रूण हत्यावर माहितीपट, वक्तृत्व स्पर्धा, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले.
समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाईकडून काही अपेक्षा आपण करू शकतो, यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याच्यादृष्टीने महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत डॉ. लीना बिरे काळमेघ, डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. वंदना खुशलानी, डॉ. शरयू तायवाडे यांनी विचार मांडले. प्रशासकीय, वैद्यकीय, मानसतज्ज्ञ आणि शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समाज जागृतीसाठी एक कृती दल तयार करणे हा कार्यशाळेचा उद्देश होता. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अनुराधा खेर्डेकर, संचालन डॉ. संगीता जीवनकर तर आभार डॉ. यशोधरा हाडके यांनी मानले.