शाळेत पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी एखादं छोटं रोपं दिलं तर ते अधिक योग्य होईल. येणाऱ्या पाहुण्याबाई पर्यावरणासाठी काम करणाऱ्या होत्या त्यामुळे हा विचार सगळ्यांनाच पसंत पडला, पण तुळशीचं रोपं नको, ते नेहमीच दिलं जातं. त्यापेक्षा फारशी देखभाल करावी लागणार नाही असं बहुगुणी असलेलं एखादं रोपं देणं हा चांगला पर्याय ठरेल. नर्सरीतून काही आणणं अशक्य, बाहेर चिक्कार पाऊस लागलेला.
शाळेच्या गच्चीवर एक छोटंसं किचन गार्डन केलं होती. मुलांना मी तिथे घेऊन गेले. एक- एक झाडं पाहत होतो. पावसामुळे तुळस मस्त बहरली होती. घेवड्याचा वेल मांडवावर डोलत होता. उन्हाळ्यात लावलेल्या अननसाने चांगलाच जोर धरला होता. कोणीतरी मोड आलेला नारळ आणून दिला होता. त्याच्यीही वाढ चांगली झाली होती. आपली आपण उगवून आलेली जांभळाची आणि फणसाची रोपं दोन फूट उंचीची झाली होती. यातलं काही द्यावं का?
बागेतली फेरी पुरी होत आली, तरी काय द्यावं हे ठरेना. अगदी टोकाला एक जुनी कुंडी होती. तिच्यात गोकर्णाचा वेल वाढत होता. कोणी भेट दिलेल्या बिया घाई घाईत या कुंडीत टाकल्या गेल्या होत्या. पुढे मे महिन्यात शाळेला सुटी लागली. कोणाच्या फारशा लक्षात न आलेल्या या बिया पावसाचं पाणी पडल्यावर उगवून वर आल्या. नाजुकशी, तरीही सशक्त अशी चार रोपं कुंडीतल्या वाळक्या झाडाच्या आधाराने वाढली होती. त्यांचे ते आधारासाठी पसरलेले हिरवे नाजूक तंतू पार एकात एक गुंतले होते.
गोकर्णाचा वेल देऊया. उत्तम पर्याय ठरेल. सगळ्यानुमते ठरलं.
मुलं कामाला लागली. इको क्लबचा प्रेसिडेंट असलेला मुलगा लगेच पुढे सरसावला. छोटं खुरपं घेऊन त्याने ती रोपं मातीतून अलगद सोडवली. उण्यापुऱ्या दोन महिन्यांत त्या छोट्या रोपांनी आपली मुळं खोलवर पसरवली होती. आपल्या अस्तित्वासाठी प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट ही किती निकराचा प्रयत्न करते ही एक नवी गोष्ट मुलांना ती वेल मातीतून सोडवताना कळली. इकडे काही मुलांनी कुंडी तयार केली होती. विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, वाळक्या काटक्या याने कुंडीचा तळ झाकत, वर भरपूर सुकलेला पालापाचोळा घातला होता. सगळ्यात शेवटी पाल्यापासून बनवलेलं मऊ कंपोस्ट पसरवलं होतं.
वजनाला हलकी अशी पर्यावरणपूरक घटकांनी भरलेली कुंडी सज्ज झाली होती. ती तीनही रोपं मुलांनी त्यात लावली, सायन्स लॅब मधून तारा आणल्या गेल्या. त्या तारांची छान सहा पदरी वेणी घालत, लांब दोरीसारखी रचना केली. डोमच्या आकारात या तारांच्या वेण्या मातीत खोचून त्यावर वेलीचे आधारक गुंडाळले गेले. ही सगळी कामं अतिशय जबाबदारीने आणि मुख्य म्हणजे नाजूकपणे मुलंच करत होती. एरवी दंगामस्ती करणारी ती सगळी प्रजा आज या कामात अगदी तल्लीन झाली होती. रोपाची तयारी पूर्ण झाली, पण वेलीच्या शेंड्याकडचा भाग मलूल झाला होता. त्यांने डौल उणावल्या सारखा वाटतं होता.
कुंडी बदलामुळे झाडाला लागलेल्या धक्क्याचा तो परिणाम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रोपं टवटवीत होणार होतं आणि झालंही. कार्यक्रम उत्तम पार पडला. प्रमुख पाहुण्यांनी आवर्जून त्या हिरव्या भेटीची तारीफ केली. एक प्रसंग साजरा झाला.
या सगळ्या व्यापात मुलं काय शिकली, हे अधिक महत्त्वाचं होतं. प्रमुख पाहुण्यांसाठी भेट तयार करणं ही साधी कृती मुलांना बरंच काही शिकवून गेली होती. तेही अगदी नकळत. वेलीचा अस्तित्व टिकवण्यासाठीचा प्रखर प्रयत्न, वाढीचा संघर्ष, मिळेल त्या आधाराला धरून फोफावणं, आधारकाची मजबूत साथ, कुंडी बदलामुळे रोपाला लागणारा धक्का, नवीन वाढणारी पानं मलूल होऊन त्याद्वारे ती गोष्ट सुचित करणारी वनस्पतींची सूचन शक्ती. अशा कितीतरी गोष्टी या एका घटनेतून मुलांना कळल्या.
एका साध्याशा कृतीतून अनेक गोष्टी अधोरेखित होत होत्या. झाडापानांनाही माणसांप्रमाणे भाव-भावना, संवेदना असतात. स्पर्शाची भाषा त्यांना कळते. प्रत्यक्ष बोलून नाही, तर आपल्यातल्या छोट्या बदलातून ती आपल्याशी संवाद साधत असतात. या सगळ्या गोष्टी न बोलता, न शिकवता उमगल्या होत्या. पुढच्यावेळी वेळ राखून आपण झाडांची कुंडी बदलूया. काही कामं पावसाळ्या आधीच पूर्ण करूया, वेलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आधीच तयार ठेऊया. असे किती तरी मुद्दे मुलांनी आपल्या डायरीत नोंदवून ठेवले.
हे सगळं अतीव समाधान देणारं होतं. मुलं खऱ्या अर्थाने निसर्गशिक्षण घेत होती. झेन जी म्हणून ओळखली जाणारी ही नवीन पिढी संवेदनशील होती. त्यांच्या जाणिवा प्रगल्भ आणि सूक्ष्म होत्या.
रोपं भेट देणं या एका कृतीतून जे शिकता आलं होतं ते वर्गात चार तासिका वापरूनसुद्धा शिकवता आलं नसतं, कारण खरं शिक्षण हे जाणिवेवर आधारलेलं असतं, ते सहज शिक्षण असतं आणि खरा गुरू असतो तो निसर्ग.
mythreye.kjkelkar@gmail.com