डॉ. उल्का नातू – गडम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताडाच्या उभ्या झाडाप्रमाणे दिसणारा शरीराचा आकृतीबंध म्हणजे ‘ताडासन’. त्या ताडाच्या झाडाला एकीकडे झुकविणे हे झाले तीर्यक ताडासन!

आसनांचे लाभ सांगताना ‘आसनेन भवेत् दृढम्’ म्हणजे दृढता प्राप्त होते असे हठप्रदीपिका म्हणते. त्याचप्रमाणे ‘योगांद्गानुष्ठात् अशुद्धिक्षये ज्ञानदीतिराविवेकरण्यते’ असे पतंजली म्हणतात. म्हणजेच आसनांच्या सरावाने अशुद्धीचा क्षय होतो आणि सारासार विवेकबुद्धी वाढीला लागते.

आज आपण तीर्यक ताडासन या आसनाचा सराव करुया.

प्रथम दंडस्थितील विश्रांती अवस्था घ्या. आता आसनाच्या प्रथम अवस्थेत वाटचाल करण्यासाठी दोन्ही पाय एकमेकांसमोर समांतर जोडून घ्या. पावले जोडलेली किंवा दोन्ही पायांत हवे तेवढे अंतर आपल्या आवश्यकतेनुसार घ्या.

दोन्ही हात शरीराच्या बाजूला असतील. आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेन वर घ्या. दोन्ही हातांची बोटे डोक्याच्या वर एकमेकांमध्ये गुंफा. आता हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला वर घ्या. हात कोपरात सरळ असतील.

आता पाय गुडघ्यात सरळ / दोन्ही पायांत अंतर, दोन्ही हाताची कोपरे सरळ ठेवत शरीराच्या उजव्या बाजूला पाठकणा वाकवा. हे करीत असताना शरीर पुढे अथवा मागे झुकवू नका.

शरीराचा गुरुत्वाकर्षणाचा बिंदू ध्यानात घेऊन तोल सांभाळा. अंतिम स्थितीत डोळे न मिटता नजर समोर कुठल्या एक काल्पनिक वर्तुळाच्या मध्यभागी स्थिर ठेवा.

दीर्घश्वसनाची तीन ते चार अवर्तने करा. पुन्हा एकदा मध्यभागी या. विरुद्ध बाजूला आसनाची कृती पुन्हा करा. श्वसनक्षमता, पाठकण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

ulka.natu@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of tiryaka tadasana height growth nrp