घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा खून करावा, त्या खुनानंतर त्यांची ९ वर्षांची मुलगी तिथे यावी आणि पुढे तिलाच या प्रकरणात आपल्या आईच्या खुनाच्या खटल्यात आरोपी असलेल्या वडीलांविरोधात साक्ष द्यायला लागावी. आईचे निधन झालंच आणि वडील आयुष्यभराकरता तुरुंगात गेल्यानं त्या मुलीची काहीही चूक नसताना ती अनाथ व्हावे हे अत्यंत दुर्दैवी सामाजिक वास्तव आहे असंच म्हणावं लागेल.
पती पत्नीतील घरगुती कलह आणि भांडणं त्या नात्याचा एक भाग आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. असे घरगुती कलह आणि भांडणं मर्यादित असतात तोवर काही चिंता नसते, मात्र जेव्हा अशा कलहांना आणि भांडणांना हिंसक वळण लागतं तेव्हा चिंताजनक आणि दुर्दैवी स्थिती उद्भवते. अशाच एका प्रकरणात नुकताच सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला. २००६ साली घरगुती भांडणातून पत्नीची हत्या झाली, या प्रकरणात पतीवर हत्येचा आरोप होता. पतीवर गुन्हा दाखल झाला, खटल्याची सुनावणी झाली आणि सत्र न्यायालयानं पतीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याविरोधात केलेलं अपील उच्च न्यायालयनं फेटाळल्यानं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
या प्रकरणात पत्नीची हत्या करण्याच्या हेतूनं मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं. मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. मुलीच्या साक्षीप्रमाणे – त्या रात्री ती, तिची आई व वडील तिघेही घरात झोपले होते, रात्री आईचा खोकण्याचा आवाज आणि गडबड ऐकून ती जागी झाली, वडील आईजवळ बसले होते, आईवर चादर ओढलेली होती आणि वडिलांनी तिला ती चादर काढू नको असं सांगितलं. वडिलांनी डॉक्टारांना बोलावतो असू सांगून घर सोडलं आणि ते परत आले नाहीत. मात्र खूप वेळ झाला तरी वडील आले नाहीत म्हणून तिनं आईच्या डोक्यावरची चादर काढली. तेव्हा तिनं आईच्या डोक्यावर रक्तानं माखलेल्या जखमा पाहिल्या, तिनं ताबडतोब शेजारी व जागा मालक यांना बोलावलं. मुलीची आणि जागामालकाची साक्ष ही कोणत्याही बाबतीत आणि केव्हाही डळमळीत झाली नाही. बचाव पक्षाने मुलीची साक्ष म्हणजे तिला ‘शिकवलेली साक्ष’ दिली असा आरोप केला; मात्र न्यायालयानं हा दावा फेटाळला. या प्रकरणात मुलीची साक्ष नैसर्गिक, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह ठरली. अटकेच्या वेळेस आरोपीच्या शर्टवर मृत व्यक्तीचे रक्त आढळल्यानं आरोपीचा घटनास्थळी सहभाग अधिक ठोसपणे सिद्ध झाला. पुरावा कायदा अलम १०६ अंतर्गत आरोपी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि अपील फेटाळून शिक्षा कायम केली. दरम्यानच्या काळात आरोपीस जामीन मंजूर झालेला असल्यानं त्यानं चार आठवड्यांत शरण यावं असेही आदेश दिले.
या प्रकरणात जेव्हा प्रत्यक्ष गुन्हा घडला तेव्हा तिथे फक्त पत्नी आणि पती उपस्थित होते. मात्र त्या घटनेनंतर तिथे पोचलेली पहिली व्यक्ती होती त्यांची मुलगी. म्हणूनच जरी प्रत्यक्ष गुन्ह्याच्या वेळेस ती मुलगी उपस्थित नव्हती तरी नंतर लगेचच ती तिथे उपस्थित असल्यानं तिची साक्ष महत्त्वाची ठरली. बालसाक्षीदाराची साक्ष, जर नैसर्गिक व सातत्यपूर्ण असेल तर ती निर्णायक ठरू शकते हा मुद्दा स्पष्ट करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा खून करावा, त्या खुनानंतर त्यांची ९ वर्षांची मुलगी तिथे यावी आणि पुढे तिलाच या प्रकरणात आपल्या आईच्या खुनाच्या खटल्यात आरोपी असलेल्या वडीलांविरोधात साक्ष द्यायला लागावी. आईचे निधन झालंच आणि वडील आयुष्यभराकरता तुरुंगात गेल्यानं त्या मुलीची काहीही चूक नसताना ती अनाथ व्हावे हे अत्यंत दुर्दैवी सामाजिक वास्तव आहे असंच म्हणावं लागेल.
असे गुन्हे घडतात त्यातील गुन्हेगार हे काही मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा मुरलेले गुन्हेगार नसतात. ती सर्वसामान्य माणसेच असतात. मात्र एखादा क्रोधाचा क्षण येतो आणि त्यात माणसाचे नियंत्रण सुटते आणि गुन्हा घडतो. अशा गुन्ह्यातून सगळ्यांचे नुकसानच होत असते. क्षणिक भावनावेगातून आपल्या हातून काही विपरीत झाले तर त्यात आपल्या जोडीदाराचे, आपले आणि आपल्या अपत्यांचेही कायमचे नुकसान होईल हा विचार करून प्रत्येकाने आपल्या भावनांना, क्रोधाला आवर घालणे महत्त्वाचे आहे हे या प्रकरणाने अधोरेखित केलेले आहे.