डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
गुप्तकाळ (इ.स. ३२०- इ.स.५५०) हा भारताच्या इतिहासातला अनेक दृष्टीनं महत्त्वाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये भारतातल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाला एक नवी दिशा प्राप्त झाली. नवीन प्रकारचे धार्मिक आविष्कार निर्माण झाले. विष्णु, शिव, बौद्ध आणि जैन देवता यांना मोठ्या मंदिरांमध्ये स्थान मिळालं. जुना वैदिक धर्म बौद्ध आणि जैनांच्या उदयाबरोबरच क्षीण होऊ लागला होता. तो पुराणधर्मामध्ये परिणत झाला. बौद्ध धर्म साध्या सुटसुटीत हीनयानामधून अलंकृत महायानामध्ये संक्रांत झाला. वैष्णव आणि शैव यांच्यामधली दरी थोडी थोडी लुप्त होऊन त्यांच्यामध्ये ब्रह्म्याचाही समावेश झाला. देवीचा समावेश देवांची पत्नी म्हणून फक्त होत होता. ज्यामध्ये देवी प्रधान असेल अशा पंथाची गरज भासू लागली. शिव असो, विष्णू असो किंवा ब्रह्मा हे देव देवीच्या आधिपत्याखाली आहेत अशा पंथाची गरज वाटू लागली. आणि यातूनच शाक्त पंथाचा उदय झाला. या आधीच मातेला देवता मानले जात होते. शाक्तपंथाच्या उदयामुळे या विचारधारेला एक ठोस स्वरूप प्राप्त झाले. कालांतराने, या पंथाच्या विचारामध्ये योग तत्त्वज्ञानाचा प्रवेश झाला. म्हणूनच देवी कवचामध्ये दिसणाऱ्या नवदुर्गांचे अधिष्ठान म्हणून मानवी शरीरातल्या चक्रांचा संदर्भ देतात.
नवदुर्गांमधल्या शेवटच्या म्हणजे नवव्या दिवसाच्या दुर्गेचं नाव ‘सिद्धिदात्री’ आहे. सहस्रारचक्र हे तिचं अधिष्ठान आहे. सहस्रारचक्र जागृत झालं की व्यक्तीला मोक्ष मिळतो असं योगशास्त्र सांगते. मोक्ष हे मनुष्य जीवनाचं अंतीम ध्येय आहे असं भारतीय संस्कृती मानते. साहजिकच, ही शेवटची दुर्गा प्रसन्न झाली की मनुष्याला सिद्धी प्राप्त होतात आणि मोक्षाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. म्हणून हिचे नाव ‘सिद्धी देणारी’ या अर्थाचं आहे.
योगशास्त्रात आठ सिद्धी मानल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे –
१) अणिमा – अणूप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करता येते.
२) महिमा – मानवी शरीरापेक्षा हवे तेवढे विशाल रूप धारण करता येते.
३) लघिमा – कमी वजन असलेले शरीर धारण करता येते.
४) गरिमा – खूप वजन असलेले शरीर धारण करता येते.
५) प्राप्ति – कोणतीही इच्छित वस्तू कोणत्याही ठिकाणी असली तरी ती मिळवता येते.
६) प्राकाम्य – कोणतीही इच्छा पूर्ण करता येते, कोणत्याही वस्तूचे ज्ञान मिळवता येते इ.
७) ईशित्व – जगावर स्वामित्व मिळवता येते.
८) वशित्व – संपूर्ण जगताला आपल्या काबूत ठेवता येते.
या आठ सिद्धी देणारी असल्यामुळे या दुर्गेची सेवा सिद्ध, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि देव सर्वजण करतात असे तिच्या मंत्रावरून समजते. तिचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे –
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।
(सिद्ध, गंधर्व, यक्ष इ.,असुर आणि देवदेखील जिची सेवा करतात अशी ही सिद्धिदात्री नेहमी मला सिद्धीदायक होऊ देत.)
काही ठिकाणी जयदुर्गेची उपासना सिद्धी मिळवण्यासाठी सांगितली आहे. मायातंत्र नावाचा ग्रंथ नवदुर्गांच्या यादीमध्ये सिद्धिदात्री ऐवजी ‘देवदूती’ हे नाव घालतो.
सामान्य व्यक्तीच्या परिप्रेक्ष्यामधून पाहिले तर ही देवी एक प्रौढ गृहिणी आहे. ती सर्वांना इच्छित गोष्टी देते. जरी ‘सिद्धी देणारी’ हा तिच्या नावाचा अर्थ असला तरी मनातली इच्छा पूर्ण करणारी असा साधा सरळ अर्थ घेतला तर मातृरूपी प्रौढ स्त्रिया आपल्या कुटुंबियांच्या मनातल्या साध्या इच्छा पूर्ण करू शकतात. नवदुर्गा म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातल्या अवस्था आहेत असा विचार केला तर ते खरेही आहे. प्रौढ किंवा उतार वयात स्त्री तृप्त असते. तिला भौतिक गोष्टी तशा फारशा मिळवायच्या नसतात. घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. सांगितलेली कामं करायला जवळपास तरुण मंडळी असतात. जर स्त्री जीवनाच्या चौकटीत विचार केला तर हे ठीकही आहे. परंतु सर्व स्त्रियांना हे भाग्य लाभतं का? अनेक स्त्रियांना, विशेषतः विधवांना घरात अडचण होते म्हणून तीर्थक्षेत्री सोडून येण्याची पूर्वापार पद्धत आहेच. म्हणून काशी, वृंदावन अशा ठिकाणी विधवाश्रम असतात. आर्थिकदृष्ट्या असंख्य स्त्रिया मिळवत्या नसतात. त्यांना संपत्तीमध्ये आपल्याला हक्क आहे का नाही हे माहीतही नसते. आणि समजा माहीत असले तरी कोण कोर्ट कचेरीची पायरी चढायला धजावेल? संपत्ती नाही म्हणून अनेक वृद्ध बायकांना बसमध्ये बसवून देतात. बस थांबेल तिथं घ्यायला कुणीही आलेलं नसतं. अशिक्षित बाईला पुन्हा घरी कसं जावं समजत नाही. अशा अनेक बायका रस्त्यावर भीक मागताना दिसतात.
ही आहे सिद्धिदात्री स्त्रियांची स्थिती. स्त्रियांच्या सक्षमीकरणाची गरज असते ती इथे. अर्थार्जन करता येणे आणि आपले हक्क समजणे एवढं तरी शिक्षण प्रत्येक बाईला मिळायला हवं. तिचा संपत्तीवर अधिकार हवा. तिला घरात सन्मान हवा. यासाठी, तिच्यामध्ये देवी शोधण्या ऐवजी तिला माणूस म्हणूनच राहू द्यावे. तिच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
अनेक स्त्रियाही इच्छित गोष्टी मिळाव्यात म्हणून नवरात्र व्रत करतात. पाणीही न पिता कडक उपास, अनवाणी चालणं, घाणेरड्या रस्त्यांमधून लोटांगण घालणं इ. क्रिया या व्रताच्या निमित्तानं करतात. यातल्या बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. व्रतवैकल्ये नवीन परिप्रेक्ष्यात पाहायची आवश्यकता आहे. त्यासाठी या सर्व सणांचा, त्याकडे पाहण्याच्या तत्कालीन दृष्टिकोनाचा आणि त्या सणाचे मूल्य कायम ठेऊन नवीन स्वरूप देण्याचा विचार व्हायला हवा. ती प्रेरणा या नवदुर्गा आपणा सर्वांना देवोत ही सदिच्छा आणि प्रार्थना.