डॉ. अश्विन सावंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संप्रेरक (हार्मोन्स) हे शरीरामधील दूत असतात, जे एखाद्या ग्रंथीमधून स्रवून रक्तामधून प्रवास करत दुसऱ्या एखाद्या ग्रंथीला किंवा अवयवाला विशिष्ट कार्य करण्याचा संदेश देतात. ते कार्य न करण्याची मुभा संदेश स्वीकारणाऱ्या अवयवाला नसल्याने तो संदेश म्हणजे आज्ञाच असते. अशाप्रकारे शरीराला (मेंदूला) आवश्यक वाटणाऱ्या क्रिया करण्याची प्रेरणा विशिष्ट अवयवांना देण्याचे कार्य करतात ते संप्रेरक. उदाहरणार्थ- इन्सुलिन हा स्वादुपिंडा (पॅन्क्रिया) मधून स्रवणारा संप्रेरक, अन्नसेवनानंतर रक्तात साखर वाढली की स्रवतो आणि साखरेच्या चयापचयावर नियंत्रण ठेवतो. अशाचप्रकारे मानवी शरीर पुरूषाचे होणार की स्त्रीचे आणि त्यानुसार त्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल घडवणारे जे संप्रेरक असतात त्यांना लैंगिक संप्रेरक (सेक्स हार्मोन्स) म्हणतात, तेही ठरविण्याचे काम हाच करतो… जसे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन वगैरे. यातले इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्री-शरीरामधील हार्मोन्स, तर टेस्टोस्टेरॉन हा बाहुल्याने पुरुष शरीराचा हार्मोन. या फरकामुळेच स्त्रीचे शरीर हे स्त्री शरीरासारखे आणि पुरुषाचे शरीर हे पुरूष शरीरासारखे दिसते.

वास्तवात स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये स्रवणारे लैंगिक संप्रेरक हे तसे सारखेच असतात. फरक असतो तो त्यांचे रक्तातील प्रमाण, स्रवण्याचे स्थान, त्याची विविध अवयवांबरोबर होणारी जैव- रासायनिक क्रिया यांमध्ये. पुरुषांच्या शरीरामध्ये वृषण म्हणजे टेस्टिज मधून टेस्टोस्टेरॉन हा संप्रेरक स्रवतो, जो पुरुषाच्या शरीरामध्ये पुरुषी बदल घडवतो. याशिवाय इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनसुद्धा पुरुषांच्या वृषण, मूत्रपिंडावरील अधिवृक्क ग्रंथी, यकृत व चरबीच्या ग्रंथींमधून स्रवतात, मात्र अल्प प्रमाणात. या उलट स्त्री- शरीरामध्ये त्यांच्या ओटीपोटामध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या स्त्री- बीजग्रंथीं (ओव्हरी)कडून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवतात, जे स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्री-सुलभ बदल घडवतात. याशिवाय टेस्टोस्टेरॉन हा संप्रेरकसुद्धा स्त्री-बीज ग्रंथी व अधिवृक्क ग्रंथीमधून स्रवतो, मात्र अल्प प्रमाणात.

स्त्री-संप्रेरक आणि स्त्रीबीज निर्मितीविषयी…

स्त्री-शरीरामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींना, त्यातही प्रजननाशी संबंधित बदलांना जबाबदार असणारे महत्त्वाचे संप्रेरक (हार्मोन्स) म्हणजे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. स्त्री-शरीरामधील इतरही काही संप्रेरक आहेत. इस्ट्रोजेनची निर्मिती स्त्री-बीज ग्रंथी, मूत्रपिंडावर असलेली अधिवृक्क ग्रंथी व शरीरामधील चरबीच्या ग्रंथींमधून होते. इस्ट्रोजेन प्रमाणेच प्रोजेस्टेरॉन हा संप्रेरक सुद्धा स्त्री-बीज ग्रंथी व अधिवृक्क ग्रंथीमधून स्रवतो. इस्ट्रोजेनचे मुख्य कार्य म्हणजे तारुण्याशी संबंधित स्तनांची वाढ, केसांची वाढ, चरबीची योग्य ठिकाणी साठवणूक, कंबरेच्या हाडांचा विस्तार वगैरे शारीरिक बदल घडवणे आणि मासिक चक्राची नियमितता सांभाळणे. इस्ट्रोजेनचे स्रवण स्त्री-बीज ग्रंथीमधून बीजांड निर्माण होण्याआधी होते, तर प्रोजेस्टेरॉनचे स्त्रवण स्त्री-बीज ग्रंथीमधून बीजांड निर्माण झाल्यावर होते.

मेंदूच्या तळाशी असणाऱ्या आणि शरीराच्या सर्व जैव- रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पियूषिका ग्रंथीमधून एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) आणि एलएच (ल्युटिनायझिंग हार्मोन) हे संप्रेरक स्रवतात, जे इस्ट्रोजेनची निर्मिती वाढवतात आणि स्त्री-बीज ग्रंथीमध्ये फॉलिकल्सची वाढ करण्याचा संदेश देतात. फॉलिकल्स या पाण्याने भरलेल्या लहान पिशव्या असतात, या पिशवीमध्ये एक बीजांड असते. प्रत्यक्षात या फॉलिकल्समधील एकच फॉलिकल त्यामधील अंड्यासह परिपक्व होते, तर इतर फॉलिकल्स बीज ग्रंथीमध्ये शोषली जातात. मासिक चक्राच्या ६ ते १४ दिवसांच्या कालावधीमध्ये दोनपैकी एका स्त्री-बीज ग्रंथीमधील फॉलिकल्स (अंडे धारण करणाऱ्या पिशव्या) परिपक्व होऊ लागतात आणि १० ते १४ या दिवसांमध्ये त्यामधील एका फॉलिकल मध्ये स्त्री-बीजांड तयार होते. हे परिपक्व झालेले अंडे स्त्री-बीज ग्रंथीमधून मोकळे होऊन गर्भाशयाच्या बीजवाहिनी नलिकांमध्ये जाऊन विसावते. तिथे ते १२ ते २४ तासच जिवंत राहते, त्या तेवढ्या वेळेमध्ये जर पुरूष बीज (शुक्राणू) येऊन त्यांचे मिलन झाले तर गर्भनिर्मिती होते.

आणखी वाचा : पीसीओडी की पीसीओए? तर काय कराल?

दुसरीकडे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन मिळून दर महिन्याला गर्भाशयाची अंतःत्वचा तयार करण्यास चालना देतात. गर्भाशयातील
आंतरत्वचा ही स्त्री-बीज व पुरूष बीज यांचे मीलन होऊन गर्भनिर्मिती झाल्यास त्या गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असते आणि गर्भनिर्मिती न झाल्यास ती आंतरत्वचा मासिक पाळीला स्त्रावाच्या स्वरूपात वाहून जाते. एकंदर पाहता तारुण्यात होणारे बदल, मासिक पाळीचे चक्र, गर्भारपण व मासिक पाळीचा अंत या स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी या स्त्री-संप्रेरकांमुळेच होतात.

पुरूष संप्रेरकांची अतिरिक्त निर्मिती

पीसीओएस‌ चे प्रमुख कारण म्हणजे स्त्री-शरीरामध्ये होणारी पुरुष संप्रेरकांची (मेल-हार्मोन्सची) अतिरिक्त निर्मिती.

टेस्टोस्टेरॉन हा पुरुष संप्रेरक हेच पुरूष शरीरामधील मजबूत स्नायू व हाडे, आक्रमक स्वभाव, पुरुषी घोगरा आवाज, अंगावरील केस, चेहऱ्यावरील दाढीमिशा, वगैरे बदल घडण्याचे मूळ कारण आहे. टेस्टोस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाची स्त्री-शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात होणारी निर्मिती हेच पीसीओएस‌ विकृतीमागचे मूळ कारण आहे.

पुरूष संप्रेरक वाढण्याचे कारण : साखरेचा विकृत चयापचय- साखरेचा चयापचय (मेटाबोलिसम) बिघडणे हे इन्सुलिनची अतिप्रमाणात निर्मिती होण्याचे कारण. साखरेचा चयापचय बिघडल्याने होणाऱ्या मधुमेहामध्ये स्त्री रुग्णांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन या पुरुष-संप्रेरकाचे प्रमाण अधिक असते आणि पीसीओएस्‌मध्ये सुद्धा मधुमेहाचा धोका असतो. याचाच अर्थ पीसीओएस्‌ आणि टेस्टोस्टेरॉन या पुरूष संप्रेरकांचा संबंध आहे.

स्वादुपिंडाकडून इन्सुलिनची अतिप्रमाणात निर्मिती,त्यामुळे रक्तामध्ये इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण आणि इन्सुलिनला शरीरपेशींकडून होणारा विरोध (इन्सुलिन रेसिस्टन्स) या सर्वांच्या परिणामी स्त्रीच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात पुरुषी-संप्रेरक स्रवतात असे संशोधकांचे मत आहे.

शरीरपेशींकडून इन्सुलिनला होणारा विरोध हा आधुनिक काळातील आपल्या आहाराशी व जीवनशैलीशी संबंधित आहे आणि त्याचमुळे पीसीओएस्‌ हा आजार २१व्या शतकात वाढत गेला आहे. याविषयी समजून घेऊ उद्या.

drashwin15@yahoo.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcos facial hair why it happens and how to deal with it nrp