Whether to give birth to a child or not Reasons behind having children | Loksatta

अपत्यं जन्माला घालावीत की नाही?

लोक मुलं का जन्माला घालतात, याचं समाधानकारक उत्तर कदाचित सापडणार नाही! अनेकदा सामाजिक-कौटुंबिक दबाव आणि अपत्य या संकल्पनेशी जोडलेली कौटुंबिक स्थैर्याची भावना त्यास कारणीभूत असते. पण बदललेल्या काळात दुरावलेल्या कौटुंबिक नात्यांमध्ये पालकांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घेणं, ही संकल्पना मुलांना विशेष समजावून द्यावी लागेल…

अपत्यं जन्माला घालावीत की नाही?
अपत्यं जन्माला घालावीत की नाही

आपण कधी विचार करतो का, की मनुष्य अपत्य जन्माला का घालतो? हा प्रश्नच जरा विचित्र वाटावा इतकी ती भावना आपल्यासाठी अगदी सहजसामान्य आहे. त्यामागे आयुष्यात स्थैर्य हवं, जगण्याला अर्थ आणि उमेद हवी, आपला वंश पुढे नेण्याची आंतरिक ऊर्मी म्हणून, सामाजिक दबाव म्हणून, निरपेक्ष प्रेम देणं-घेणं, म्हातारपणाची सोय म्हणून… अशी अनेक कारणं आहेत. आता यातली शेवटची दोन कारणं पुन्हा एकदा वाचून जरा चिंतन करू या.

हेही वाचा- पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’

निरपेक्ष प्रेम! असं खरंच राहिलं आहे?… म्हणजे अगदीच नकारात्मक न होता सहज अवलोकन केलं, तर लक्षात येईल की निरपेक्ष प्रेम करणारी मंडळीच कालौघात कमी कमी होत चालली आहेत. त्या यादीत अपत्यांचा क्रमांक कदाचित फार वरच्या स्थानी लागेल! आईवडिलांनी जन्माला घातलंय ना, मग शेवटपर्यंत तुम्हीच आमची जबाबदारी उचला, असा एकंदर अनेक अपत्यांचा आवेश असल्याचं समाजात दिसून येतं. ही अतिशयोक्ती वाटत असेल, तर रुग्णालयं, वृद्धाश्रम, वृध्द अनाथाश्रम आणि ज्येष्ठ नागरिक संघ, या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा अभ्यास करता येईल. त्यामुळे आईवडिलांना निरपेक्ष प्रेम मिळणं ही फार आदर्श कल्पना झाली. सरसकट सगळीच अपत्यं आईवडिलांना दूर करतात असा याचा अर्थ नाही, पण पालकांचं शेवटपर्यंत प्रेमानं करणारी जमात दुर्मिळ होत जातेय हे मात्र मान्य करावं लागेल. त्यामुळे इथून पुढे ‘म्हातारपणाची सोय’ म्हणून कुणी अपत्य जन्माला घालण्याचा विचार करत असतील तर जरा आजूबाजूला बघूनच अपेक्षा यादी तयार करावी लागेल.

हेही वाचा- National Girl Child Day 2023 : तुमच्या मुलीला ‘या’ गोष्टी शिकवाच!

आपण पाश्चात्य संस्कृतीमधलं फक्त चांगलं तेवढं न घेता ‘कौटुंबिक विलगीकरण’ ही संस्कृती पट्कन आत्मसात केली आहे. कारणं काहीही असोत, पण आज जी पिढी साठीच्या घरात आहे आणि जी पिढी नवीन अपत्य जन्माला घालू इच्छित आहे, त्यांनी परिस्थितीचा नीट अभ्यास करूनच आपल्या अपेक्षांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. आपली मानसिकता बदलली आणि नवीन परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली, तर पुढील काळ सुखाचा जाऊ शकतो.

हेही वाचा- शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था)

काही उदाहरण बोलकी आहेत… वैदेहीला तीन भाऊ. सगळे आर्थिकदृष्ट्या संपन्न. आईवडील कुणाच्याही अध्यात मध्यात न करता आपापले स्वतंत्र रहाणारे, पण जिथे मदतीची गरज असेल तिथे धावून जात कष्टानं आणि पैशानं भरपूर मदत करणारे. तरीही जेव्हा आईला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा एकही जण मदतीला गेला नाही. वैदेही अंतरानं फार दूर असल्यानं तिला बातमी समजून पोहोचायला दोन दिवस लागले. आठ दिवस रजा घेऊन गेलेली वैदेही भावांकडून मदतीची अपेक्षा करत होती, पण तिघांपैकी एकानंही आईची जबाबदारी घेतली नाही. वैदेहीची प्रचंड ओढाताण होऊ लागली. शेवटी आईसाठी एक मदतनीस नेमून तीही आपल्या संसारात परत गेली.

हेही वाचा- …तर मग ‘लोक काय म्हणतील’ हा विचार का करायचा?

कुमार आणि शिवानी यांना दोन मुलं. वय वर्षं चौदा आणि सतरा. कुमारच्या एका अपघातानंतर त्यांची नोकरी गेली आणि शिवानीनं घर चालवण्यासाठी एक छोटीशी नोकरी पत्करली. बसल्या बसल्या काम हवं म्हणून कुमारनी खासगी शिकवण्या सुरू केल्या. आपल्या आईवडिलांची अडचणीची परिस्थिती दिसत असतानाही मुलांनी त्यांच्या पूर्वीच्या श्रीमंती सवयींना अजिबात मुरड घातली नाही. सिनेमा, पार्ट्या, महागड्या वस्तू खरेदी, हॉटेलमध्ये जाणं, अशा पूर्वी रेलचेल असणाऱ्या गोष्टी आणि महागडा क्लास लावायला हवा म्हणून मुलांनी घरात प्रचंड चिडचिड करायला, गोंधळ घालायला सुरुवात केली. सगळ्यांनी त्यांना सध्याची बिकट परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘ऐपत नसताना कशाला पोरांना जन्माला घालता?’ असा उद्धट प्रश्न मुलांनी केला.

समृद्धी ही एकुलती एक तीस वर्षांची मुलगी. दुर्दैवानं सासरची मंडळी छळवादी असल्यामुळे तिचा घटस्फोट झाला होता. तिनं नोकरी सोडली होती, ती पुन्हा करावी आणि स्वत:च्या पायावर उभं राहावं, या आईवडिलांच्या अपेक्षांचा तिला संताप येई. ‘तुम्हीच लग्न लावून दिलं आणि माझ्या आजच्या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात. आता तुम्हीच मला आयुष्यभर पोसा!’ असं म्हणत तिनं वडिलांशी वाद घातला.

हेही वाचा- बचत करायची आहे? तर मग ‘या’ सवयी सोडाच!

उदाहरणं द्यायची तर अगणित देता येतील. अशा परिस्थतीत मुलं अगदी लहान असतानाच त्यांना मोठ्यांचं करण्याची, आईवडील आणि ज्येष्ठ मंडळी घरासाठी घेत असलेल्या त्रासाची जाणीव ठेवण्याची सवय करून द्यावी लागेल. घरच्यांच्या आजारपणात मुलांना थांबवून त्यांच्याकडूनही काही कामं करवून घेणं, आपण स्वतः घरातल्या मोठ्यांची सेवा करताना त्यांच्या नजरेस पडू देणं, मुलांना आजीआजोबांची छोटीमोठी कामं करायला मुद्दामहून सांगणं, या गोष्टी कराव्या लागतील. काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकून ही फक्त आपलीच कामं आहेत, हे त्यांच्या अंगवळणी पडावं लागेल. हे जर लहानपणापासूनच नाही करता आलं, तर भविष्यात पुढच्या पिढीस नक्कीच विचार करावा लागेल की अपत्य जन्माला घालावीत की नाही?…

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:50 IST
Next Story
पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’