scorecardresearch

…तर मग ‘लोक काय म्हणतील’ हा विचार का करायचा?

‘लोक काय म्हणतील?’ हा विचार करून अनेक जण आनंदाला मुकतात. आजची पिढी तशी नाही, याबाबतीत त्यांची अगदी स्पष्ट आणि ठाम मत आहेत.

…तर मग ‘लोक काय म्हणतील’ हा विचार का करायचा?

आपण समाजात राहतो आणि त्या समाजाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला चालावं लागतं हे गेली अनेक वर्ष आपण ऐकत आहोत. त्यात एक प्रश्न कायम विचारात घेतला जातो तो म्हणजे ‘लोक काय म्हणतील?’ हाच विचार करून अनेक जण आनंदाला मुकतात. आजची पिढी तशी नाही, याबाबतीत त्यांची अगदी स्पष्ट आणि ठाम मत आहेत.

अनन्या ही आजच्या तरुण पिढीतली मुलगी. स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, समजूतदार, सर्वांशी मिळुन मिसळून वागणारी, प्रत्येकाच्या विचारांचा आदर करणारी पण स्पष्टवक्ती. घरातील सर्वांची ती खूप लाडकी. त्यांच्या घरातलं वातावरण अगदी खेळीमेळीच होतं. आई-वडील तिचे लाड करायचे पण तितकाच त्यांचा तिच्यावर धाकही होता. कुठलीही गोष्ट ती तिच्या आई-वडिलांना मोकळेपणाने सांगू शकत होती इतकं त्यांचं घट्ट बॉण्डिंग होतं. आई-वडिलांना न दुखावतात ती त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची पण नव्या पिढीतली असल्यामुळे तिचे विचार मात्र त्यापेक्षा बरेच वेगळे होते. त्यांची एक गोष्ट तिला अजिबात पटायची नाही आणि ती म्हणजे ‘लोक काय म्हणतील’ हा विचार.

आणखी वाचा : कोल्हापुरी चपलांची काळजी नक्की कशी घ्यावी? घ्या जाणून

अनन्याचा मित्रपरिवार बराच मोठा होता. यात फक्त तिच्या वयाचीच नाही तर तिच्याहून लहान आणि तिच्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या मंडळींशीही तिची छान मैत्री होती. मुख्य म्हणजे यातली एकूण एक व्यक्ती तिच्या आई-वडिलांना ठाऊक होती. पण तरीही कुठेही बाहेर जाताना जर एखाद्या मित्राबरोबर ती जात असेल तर ‘लोक काय म्हणतील’ हा विचार तिच्या आई-वडिलांच्या मनात आधी यायचा. आपली मुलगी मुलांबरोबर दिसली तर त्याची बरीच चर्चा होईल असं त्यांना वाटायचं. पण हे अनन्याला अजिबात आवडायचं नाही. एकदा एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना तिला तिचा मित्र संध्याकाळी घरी घ्यायला आला. त्याचं घरी येणं आणि त्या दोघांनी एकत्र गाडीवरून बाहेर जाणं हे तिच्या घरच्यांना फारसं आवडलं नाही. त्यादिवशी त्यांच्यात वाद झाले आणि अखेर अनन्याची अनेक वर्षांची खदखद बाहेर पडली.

अनन्या म्हणाली, “मी कॉलेजमध्ये शिकते. गेली अनेक वर्ष मी पाहतेय की, मी जसजशी मोठी होऊ लागले तसतसे तुम्ही मला मुलांबरोबर कुठे जायचं म्हटलं की, परवानगी नाकारता. ते सगळे माझे मित्र आहेत. माझ्या वयाच्या अनेक मुली त्यांच्या मित्रांबरोबर बाहेर जातात. त्यांचे आई-बाबा पाठवतातच त्यांना. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” त्यावर तिची आई म्हणाली, “अगं तसं नाही पण आजूबाजूची चार लोक बघतात आणि ती चर्चा करतात. तुला चालेल का तुझ्याबद्दल असं लोकांनी काहीतरी बोललेलं?” त्यावर अनन्या म्हणाली, “मी कोणाबरोबर बाहेर जाते हे तुम्हाला खरं खरं सांगून जाते आणि माझे सगळेच मित्र माहिती आहेत तुम्हाला. यातील अनेक जण तर बालवाडीपासून माझे मित्र आहेत. आपण चांगल्या सुशिक्षित घरातली माणसं आहोत. सगळेच निर्बंध तोडून वागायचं नाही हे मला मान्य आहे. पण मित्रांबरोबर बाहेर जाणं आणि तेही तुम्ही ओळखत असलेल्या… यात चुकीचं काहीच नाही. एकत्र दिसणारे मुलगा-मुलगी हे दरवेळी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच असतील असं नाही. ” त्यावर तिचे बाबा म्हणाले, “पण आपण समाजात राहतो आणि त्यानुसारच आपल्याला वागावं लागतं.”

अनन्याचा राग अनावर झाला. ती म्हणाली, “लोक काय म्हणतील? हाच विचार तुम्ही करता ना? पण तो का करायचा? त्याकडे आपण का लक्ष द्यायचं? आणि त्यानुसार आपण का वागायचं? ते कोण ठरवणार आपण काय करायचं किंवा काय नाही? आपण चांगलं केलं किंवा काही वाईट केलं तरी बोलणारी लोकं ही बोलतातच. मी जे काही करते ते माझ्या घरच्यांना मान्य आहे, माझ्या जवळच्या चार लोकांना मान्य आहे, बास. त्या व्यतिरिक्त आपण लोक काय म्हणतील हा विचार आपण का करायचा? हे फक्त कोणाबरोबर बाहेर जाण्याच्या बाबतीतच नाही तर इतरवेळीही हेच लागू होतं. आपण जर अपयशी झालो तर शंभर लोकं आपल्याला नावं ठेवतात, पण जर आपण यशस्वी झालो तर यातले किती जण आपलं कौतुक करतात? आपल्या कठीण काळात आपल्याबरोबर असतात? त्यांची संख्या मोजकीच. तरी तुम्ही एवढ्या सगळ्यांचा विचार करता?”

हेही वाचा : आयुष्यात प्रत्येकाला सगळं ‘बेस्ट’च हवं असतं, पण…

“आजची पिढी बेधडक आहे. पण तुमच्या पिढीतली कितीतरी जण अजूनही ‘लोक काय म्हणतील?’ हा विचार करून अनेक गोष्टी करत नाहीत. काहींना वयाच्या पन्नाशीनंतर भरतनाट्यम शिकायची इच्छा असते, काहींना रिटायरमेंटनंतर ट्रेकिंग करायचं असतं. पण तुमच्या पिढीतल्या अनेक लोकांमध्ये पहिला विचार हाच येतो की, ‘लोक काय म्हणतील?’ ते माझ्यावर हसतील का?, ते चेष्टा करतील, गॉसिपिंग करतील… लोकांना जे बोलायचं ते बोलू दे. ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळणार आहे ती गोष्ट करताना लोकांचा का विचार करायचा? प्रत्येकाचं वेगळं आयुष्य आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, प्रत्येकाचे विचार वेगळे… मला जे आयुष्यात मिळवाचंय तेच तुलाही मिळवायचं असेल असं नाही. त्यामुळे आपणही उगाचच कोणाच्या आयुष्याबद्दल बोलू नये, कोणाला जज करू नये आणि दुसरा जर आपल्याबद्दल काही बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये. मी जर एखादी गोष्ट करत असेन आणि ती माझ्या घरी मान्य असेल तर ‘लोक काय म्हणतील’ हा प्रश्नच कुठे येतो?” अनन्याचं हे बोलणं ऐकून तिचे आई-वडील स्तब्ध झाले. त्यांना तिचं म्हणणं पटलं. त्यांच्यातले याबाबतचे मतभेद त्या दिवशी जे मिटले ते नंतर निर्माण झालेच नाहीत. कारण ‘लोक काय म्हणतील’ हाच जर आपण विचार करत बसलो तर अनेक गोष्टी आपल्या हातून निसटून जातील, ज्या गोष्टी करायची इच्छा आहे त्या राहून जातील आणि उरतील ते फक्त गैरसमज

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 13:56 IST

संबंधित बातम्या