ChatGPT डेव्हलपर OpenAI ने प्रज्ञा मिश्रा (वय ३९) यांना भारतातील पहिली कर्मचारी म्हणून कंपनीमध्ये सामील करून घेतले आहे. प्रज्ञा यांची ओपन एआयमध्ये सरकारी संबंधप्रमुख [head of government relations] म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तंत्रज्ञान, धोरण आणि प्रशासन यांमधील संबंध सांभाळण्याची जबाबदारी प्रज्ञा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भारतीय सरकारी संस्था आणि स्टेकहोल्डर्स यांमध्ये OpenAIच्या वापराला आकार देण्यासाठी मदत करतील, असे इंडिया डॉट कॉमवरून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रज्ञा मिश्रा यांचा प्रवास

ओपन एआयमध्ये रुजू होण्याआधी प्रज्ञा या ट्रूकॉलर [Truecaller] या कंपनीमध्ये २०२१ पासून, डिरेक्टर ऑफ पब्लिक अफेअर्स या पदावर काम करीत होत्या. या पदाअंतर्गत प्रज्ञा यांना सरकारी मंत्रालये, गुंतवणूकदार, प्रमुख स्टेकहोल्डर्स व मीडिया पार्टनर्ससह काम करावे लागत असे. २०१८ साली मेटा [पूर्वीचे फेसबुक] प्लॅटफॉर्मसह काम करताना पहिल्यांदा प्रज्ञा यांचा संबंध टेक उद्योगाशी आला. त्या वेळेस त्यांनी व्हॉट्सअपवर चुकीची माहिती पसरवण्यासंबंधी आळा घालणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील व्हॉट्सअपमध्येदेखील नियुक्त झालेल्या प्रज्ञा या पहिल्या व्यक्ती होत्या, अशी माहिती ‘फर्स्टपोस्ट’ने दिल्याचे समजते.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली भारतीय साडी! काय आहे, ‘थारी बाय श्रुतिका’चे स्वप्न, पाहा

प्रज्ञा मिश्रा यांची शैक्षणिक वाटचाल

प्रज्ञा यांनी २०१२ साली इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीएचे [MBA] शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून, बार्गेनिंग आणि निगोसिएशन क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रज्ञा यांनी कॉमर्स / वाणिज्य क्षेत्रामधील दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले होते.

प्रज्ञा मिश्रा एक पॉडकास्टर आणि गोल्फर

व्यावसायिक कामगिरीपलीकडे प्रज्ञा यांचा अनेक गोष्टींमध्ये सहभाग आहे. प्रज्ञा यांचा स्वतःचा प्रज्ञान [Pragyaan] नावाचा पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टमध्ये त्या विविध विषयांवर, चर्चा करीत असतात. इतकेच नव्हे, तर प्रज्ञा या उत्तम गोल्फर आहेत. १९९८ ते २००७ साली त्यांनी आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

हेही वाचा : कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….

प्रज्ञा मिश्रा यांना ओपनएआयकडून नोकरीची संधी मिळणे हे प्रज्ञा यांच्या भारतीय बाजारपेठेशी असलेल्या संबंधांचे आणि बांधिलकीचे उदाहरण आहे, असे म्हणता येईल. ChatGPT चा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापरकर्ता हा भारत असून, प्रज्ञा यांच्या नियुक्तीमुळे OpenAI ची आपल्या देशातील पार्टनरशिप अधिक वाढण्यास मदत होईल.

OpenAI’s मध्ये प्रज्ञा मिश्रा या भारतातील पहिल्या कर्मचारी म्हणून रुजू झाल्याने, इतर अनेक महिलांनादेखील नरेटिव्ह एआय लॅण्डस्केपमध्ये काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is pradnya mishra golfer podcaster and first employee hired in openai india team check out her journey chdc dha