विश्वचषकामध्ये भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानी समर्थक व्यक्तिरेखेची ‘मौका-मौका’ जाहिरात क्रीडा जगतामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पहिल्या आवृत्तीनंतर प्रत्येक प्रतिस्पध्र्याविरुद्धच्या भारताच्या लढतीबाबत जाहिरातीच्या प्रत्येक आवृत्तीबद्दलचे कुतूहल आणि उत्कंठा प्रेक्षकांमध्ये वाढतच आहे. या प्रत्येक नव्या जाहिरातीसोबत ‘मौका मौका’चा ठेका अधिक घुमू लागला आहे. मात्र, या जाहिरातीमागची मूळ संकल्पना डोंबिवलीतील प्रथमेश साप्ते या तरुणाची असून त्यानेच या जाहिरातीचे लेखनही केले आहे.
विश्वचषकाच्या विजेत्याबाबत कितीही उत्कंठा असली तरी त्याहूनही अधिक प्रतीक्षा या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची असते. १९९२पासून पाच वेळा विश्वचषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोन्ही संघांत नेहमीच भारताची सरशी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीने पाकिस्तानी क्रिकेटरसिकाची कैफियत मांडणारी ‘मौका-मौका’ जाहिरात प्रसारित केली. ती इतकी लोकप्रिय झाली की नंतरच्या प्रत्येक सामन्यापूर्वी ‘मौका-मौका’च्या नावाने येणारी प्रत्येक जाहिरात क्रीडा रसिकांसोबत सर्वसामान्य प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतली. मात्र, ही संकल्पना ‘स्टार स्पोर्ट्स’च्या चमूमध्ये असलेल्या प्रथमेश साप्तेच्या डोक्यातून निघाली आहे.  
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट प्रेक्षकांची संख्या वाढवण्याची जबाबदारी ‘स्टार स्पोर्ट्स’च्या क्रिएटीव्ह टीमकडे होती. या विभागाचे प्रमुख जुजू बासू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या या चमूच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा प्रथमेशने ‘‘पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तरुणाचे फटाके फोडण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण होणार का?’’ अशी कल्पना मांडली. ती साऱ्यांनीच उचलून धरली. त्या संकल्पनेवर आधारित ‘मौका-मौका’ ही कव्वाली विकास दुबे यांनी लिहिली. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आलेल्या त्या जाहिरातीने लोकप्रियतेचे शिखर गाठले. एवढेच नव्हे तर, ‘यू टय़ुब’वरून ‘मौका-मौका’शी संबंधित अनेक वेगवेगळय़ा चित्रफितीही लोकप्रिय ठरू लागल्या आहेत.
डोंबिवलीतच वाढलेल्या प्रथमेशने चंद्रकांत पाटक विद्यालय आणि रूईया महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर चुलत भावाच्या आग्रहाखातर जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले. वडील पुष्पकसेन साप्ते आणि आई स्नेहल साप्ते दोघेही जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असल्याने कलेचा वारसा प्रथमेशला लाभला होताच. त्यातूनच त्यातूनच गेल्या चार वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात प्रथमेशने चांगले यश मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी लिहिलेल्या जाहिरातीला लोकांनी दिलेली पसंती माझ्यासाठी आनंददायी आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ही जाहिरात आता पुढे सरकली आहे. मात्र, विश्वचषकातील प्रवासानंतरही ही जाहिरात पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.  रोहित खन्ना, जुजू बासू, मुस्तफा रंगवाले, प्रथमेश विकास दुबे, अतुल्य प्राशर, अजित मेस्त्री या सर्व चमूचे या जाहिरातीमध्ये महत्वपुर्ण योगदान आहे. केतकी गुहागरकर या जाहिरातीच्या निर्मात्या आहेत.     
प्रथमेश साप्ते

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauka mauka famous in world cup