राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या व अनेक नामवंत कलावंत घडविणाऱ्या सर ज.जी. कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय आणि सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीनही शासकीय महाविद्यालयांना संपूर्ण स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची आखणी करणे या संस्थेस आता शक्य होईल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
जगभरातील शिक्षणव्यवस्थेत व अभ्यासक्रमांत झपाटय़ाने बदल होत असल्याने जुने शिक्षणक्रम अपुरे पडत आहेत. जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावेत, काळानुसार होणाऱ्या ज्ञानविस्ताराचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांत सुधारणा करणे आवश्यकच होते. त्यासाठी या संस्थांना प्रशासकीय, आर्थिक व शैक्षणिक स्वायत्तता देणे गरजेचे होते. आता या संस्थांना विविध उद्योगांशी समन्वय साधून आवश्यक त्या अभ्यासक्रमांची अद्ययावत आखणी करणे सुलभ होईल, असे तावडे म्हणाले. या तीनही शासकीय महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाल्यानंतर संस्था नोंदणी नियमानुसार त्यांची नव्याने नोंदणी करावी लागेल, तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संस्थेच्या प्रशासकीय व व्यवस्थापकीय रचनेतही बदल करावे लागतील. त्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. दृश्यकलेतील नामांकित कलाकार किंवा नामांकित कलाशिक्षणतज्ज्ञ किंवा नामांकित वास्तुशास्त्रज्ञ या मंडळाचे अध्यक्ष असतील.
विविध क्षेत्रांतील नामवंतांची नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात येईल. हे मंडळ संस्थेतील अभ्यासक्रमाचा दर्जा, सोयीसुविधा, परीक्षा, अर्थव्यवहार, इमारती व बांधकामे आदींबाबत समित्या नेमून त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊन संस्थेचा कारभार चालवितील, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.