X
X

भरारीचे भांडवल

READ IN APP

देशाभिमान ज्यांच्या वाटचालीकडे पाहून शिकावा अशा ज्या थोडय़ा संस्था आहेत

देशाभिमान ज्यांच्या वाटचालीकडे पाहून शिकावा अशा ज्या थोडय़ा संस्था आहेत, त्यांत इस्रोचा क्रमांक नेहमीच वरचा होता आणि राहील.

आयआयटीसारख्या संस्थांचे सामाजिक संशोधनातील यश हे नक्कीच इस्रोपेक्षा कमी आहे, पण त्यांची ओळख इस्रोपेक्षा जास्त आहे. याचे कारण बोलबाला. म्हणूनच आपण काय करतो आणि कशासाठी, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही आता तयार झाली पाहिजे.

अभिमान असावाच. पण तो का आहे हे नेमके माहीत असावे. म्हणजे तो क्षणिक उन्मादापुरता न राहता उपयोगी पडतो. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘पीएसएलव्ही – सी ३४’ या धृवीय उपग्रह प्रक्षेपकाने बुधवारी घेतलेली भरारी एकाच वेळी २० उपग्रह नेणारी होती, ही कामगिरी अभिमानास्पद आहेच. अन्य देशांचे – विशेषत: अमेरिका, कॅनडा आदी प्रगत देशांचे किंवा गुगलसारख्या जगड्व्याळ कंपन्यांचे उपग्रह आपण अंतराळात सोडतो आणि यातून इस्रोसारखी संस्था आर्थिक स्वयंपूर्णतेच्या मार्गावर पुढे जाते, हे आणखी विशेष. यंदा पुणे आणि हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले उपग्रहदेखील सोडण्यात आले आहे. देशाबद्दल असलेला अभिमानही अशा कामगिरीने वाढतो, हे खरे. परंतु या भरारीमागील शास्त्रज्ञांपासून ते कर्मचारीवर्गापर्यंत अनेकांचे कष्ट, बुद्धी, या संघटनेतील व्यवस्थात्मक शिस्त यांची चर्चा होत नाही. इस्रोचा अभिमान आता आहे पण आधी नव्हता, असेही नाही. देशाभिमान ज्यांच्या वाटचालीकडे पाहून शिकावा अशा ज्या थोडय़ा संस्था आहेत, त्यांत इस्रोचा क्रमांक नेहमीच वरचा होता आणि राहील. दुसरीकडे, इस्रोला स्थापनेपासूनच वेळोवेळी सुनावले गेलेले. ‘देशातील जनतेला खायला अन्न नाही आणि चालले अंतराळात,’ यासारखे टीकेचे बोल हे काही कुणा देशद्रोह्य़ांचे नसून तेही देशप्रेमातूनच आलेले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. ही टीका पाचपोच नसलेली आणि भंपक ठरली, याचे श्रेय अर्थातच इस्रोच्या कर्तबगारीला आहे. व्यवस्थांपेक्षा व्यक्तीला मोठे ठरवणाऱ्या आपल्या देशात इस्रोमधील काही व्यक्तीही मोठय़ा झाल्याच, पण अशा व्यक्ती आल्या आणि गेल्या तरी इस्रोने दबदबा कायम ठेवला. तो का, हे समजून घेतले पाहिजे.

सरकारच्या अधीन असली, तरी इस्रो ही १५ ऑगस्ट १९६९ या स्थापना दिनापासूनच स्वायत्त संस्था होती. दूरचित्रवाणीच्या – म्हणजे सरकारी मालकीच्याच ‘दूरदर्शन’च्या प्रसारासारख्या शासकीय उद्दिष्टांकरिता इस्रोला राबविले गेले हे खरे, पण इंदिरा गांधी यांच्या राजवटीतील तो काळ प्राधान्यक्रम पुन्हा नव्याने ठरवण्याचा होता. इस्रोने उपग्रह पाठवून शेती, दूरसंपर्क आणि शिक्षण अशा क्षेत्रांसाठी साह्य़भूत व्हावे, अशी भाबडी उद्दिष्टे एकीकडे तर अणुसंशोधन क्षेत्रात ‘बुद्ध हसला’सारखी महत्त्वाकांक्षा दुसरीकडे, असा तो काळ. अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचे, तसेच अंतराळ क्षेत्रातही, अशी त्या वेळची स्वप्ने. उपग्रहाचे पहिले भू-केंद्र १९६७ मध्ये तयार, मग १९६९ मध्ये अणुऊर्जा खात्याच्या देखरेखीखाली, अंतराळ संशोधनाच्या कामासाठी ‘इस्रो’ची स्थापना, त्यानंतर मंत्रिमंडळात वेगळे अंतराळ-संशोधन खाते आणि या संस्थात्मक घडामोडींशी संबंध नसलेल्या शास्त्रज्ञांनी भरपूर काम करून अवघ्या सहा वर्षांत साध्य केलेली ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाची जुळणी, इथवरची वाटचाल हा इस्रोचा पहिला टप्पा आहे. येथून पुढल्या १९८०च्या दशकापर्यंत ‘इन्सॅट’ उपग्रहांची मालिका कार्यरत होणे हा दुसरा आणि १९९० पासून धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) तसेच भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) पूर्णत: भारतीय संशोधनातून बनवले जाण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनेदेखील इस्रोने स्वत: बनविणे, हा तिसरा. ‘मंगलयान’ ते ‘चांद्रयान’ या चौथ्या टप्प्यावर आता आपण आहोत. या सर्व टप्प्यांत कोणतीही वाच्यता न करता, देशाच्या संरक्षणाची गरज भागेल असे कामही इस्रो करीत आली. पण स्वायत्तता आजवर कधीही धोक्यात आली नाही.

स्वायत्तता असेल, तर इच्छाशक्ती वाढते. उद्दिष्ट तद्दन सरकारीच असले, तरी त्यामागचा हेतू देशाला बळ देणारा आहे, ही सुखावह जाणीव इस्रोतील शास्त्रज्ञांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांची इच्छाशक्ती वाढविणारी ठरली आहे. ती कशी, हे एपीजे अब्दुल कलामांच्या पुस्तकांतून बऱ्याच जणांनी वाचले असेल आणि कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांच्यासारख्यांच्या मुलाखतींतून थोडय़ा जणांनी. हे कस्तुरीरंगन व अन्य काही जण श्रीलंकेतील एका महिलेला कागदपत्रे पुरवीत होते असा बेलगाम आरोप झाला आणि त्याची कसून छाननीही झाली, परंतु यातून ते निदरेष असल्याचे सिद्ध झाले. मात्र या कस्तुरीरंगन यांच्याच काळात रॉकेटची वहनक्षमता वाढवण्याच्या संशोधनाचे अनेक टप्पे इस्रोने ओलांडले होते. संस्थेची पुढली महत्त्वाकांक्षा काय असली पाहिजे, याबद्दल कस्तुरीरंगन यांचे बोलणे प्रेरक असे, हे कुणाला आठवणारही नाही. पण प्रत्यक्षातील याचा सुपरिणाम म्हणजे एकाच वेळी २० उपग्रह सोडण्याची आज कमावलेली क्षमता. असे अनेक उपग्रह सोडण्याचे जागतिक उच्चांक २९ आणि ३७ पर्यंत जातात. त्याची बरोबरी आपण करू किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. कदाचित असल्या उच्चांकांच्या फंदात न पडता, आपण धृवीय उपग्रह प्रक्षेपकाला त्याच्या तुलनेने कमी कक्षेच्या क्षमतेचे काम करू देऊ आणि चांद्रयानच्या दृष्टीने काम करण्यासाठी उंच कक्षांमध्ये भरारी घेण्याकडे लक्ष पुरवू. पण इस्रो आपल्या कामाचा गवगवा करीत नसल्याने तेथे काय चालले आहे, याची चर्चा न करणे बरे. येथे लक्षात एवढेच ठेवायचे की, तातडीची उद्दिष्टे आणि दीर्घकालीन हेतू यांची सांगड ही संस्था नेहमीच घालत आली आहे.

आपल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अंतराळ संशोधन खात्यासाठीची तजवीज आहे सहा हजार कोटी रुपयांची. ती यंदाच कमी झाली असेही नाही. तुटपुंज्या तरतुदीतही काम कसे करायचे, याचे धडेच इस्रो स्थापनेपासून – किंवा त्याहीआधीच्या नेहरूकाळात अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा व सतीश धवन यांसारख्या अणुऊर्जा संशोधन प्रकल्पप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यापासून – गिरवते आहे. आर्थिक स्तरावरही इस्रोने स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या बाजारात जगभरात भारताचा हिस्सा हा चार टक्के असला तरी तो सातत्याने वाढत आहे. बाजारात सर्वाधिक हिस्सा अमेरिकेचा ४१ टक्के इतका आहे. म्हणजे आज अमेरिकेचे उपग्रह आपण सोडतो ते ‘अमेरिकेला भारतातून उपग्रह सोडणे स्वस्त पडते म्हणून’ या वावदूक शेरेबाजीला काही अर्थ उरत नाही. दर्जा आणि किफायत यांबाबत आपण उणे नाही, हे अधिक महत्त्वाचे. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांला दोन कोटी पॅकेजची नोकरी मिळाली, संस्थेला जागतिक क्रमवारीत अमुक इतके स्थान मिळाले अशी जाहिरात करणाऱ्या आयआयटीसारख्या संस्थांचे सामाजिक संशोधनातील यश हे नक्कीच इस्रोपेक्षा कमी आहे. पण त्यांची ओळख इस्रोपेक्षा जास्त आहे. याचे कारण बोलबाला. या एकाबाबतीत मात्र इस्रो मागे आहे.

आपण नेमके काय काम करतो हे जगातील तज्ज्ञांना समजेल अशा भाषेत संकेतस्थळावर मांडून ठेवले की आपण प्रसिद्धी केली असे म्हणून शास्त्रज्ञ समाधान मानतात. पण विज्ञानक्षेत्रातील संस्थेने सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. यापूर्वी अणुऊर्जेच्या बाबतीतही हेच होत होते. अखेर जैतापूरसारख्या अणु प्रकल्पांना विरोध होऊ  लागला तेव्हा मात्र लोकांचे प्रबोधन करण्यासाठी विविध उपायायोजना करून विभागाने लोकांच्या मनातील अणुऊर्जेचे भय काढण्याचा प्रयत्न केला. चांद्रयान वा मंगळयानाला विनाकारण ‘पांढरा हत्ती’ ठरवणारे लोक आजही आहेतच. तेव्हा आपण काय करतो आणि कशासाठी, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही आता तयार झाली पाहिजे. खरे तर राज्याराज्यांतील साहित्य संस्कृती मंडळेदेखील किमान नव्या मजकुरासाठी तरी इस्रोच्या कामाबद्दल आपापल्या राज्याच्या भाषेत पुस्तके  छापली जावीत, यासाठी प्रयत्न करू शकतात. ते होत नाहीत, कारण या मंडळांना ना इस्रोएवढी स्वायत्तता आणि ना हेतूंचे भान. तेव्हा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी नव्हे, तर विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधन का महत्त्वाचे हे लोकांना समजण्यासाठी तरी इस्रोने लोकांपर्यंत लोकांच्या भाषेत पोहोचावे. भांडवल कमी आणि जाहिरात अधिक असल्या आजच्या काळात, इस्रोच्या भरारीमागील तत्त्वांचे भांडवल अनमोलच ठरते.

 

23
X