उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतली गेल्यानंतरही सलग दुसऱ्या महिन्यात वाहन उद्योगाने विक्रीतील वाढ नोंदविली आहे. फेब्रुवारीमध्ये आघाडीतील कंपन्यांसह अनेक वाहन कंपन्यांनी वार्षिक तुलनेत अधिक वाहनांची विक्री केली आहे.
यंदाच्या फेब्रुवारीमध्ये विक्री वाढ नोंदविलेल्या कंपन्यांमध्ये मारुती, ह्य़ुंदाईसह टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड यांचा समावेश आहे. तर दुचाकीमध्ये होन्डा, टीव्हीएसची उंचावणारी कामगिरी आहे. जनरल मोटर्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र, एस्कॉर्टस्, बजाज ऑटो यांना मात्र यंदा वाहन घसरणीला सामोरे जावे लागले आहे.
टाटा मोटर्स, होन्डा कार्स यांनी तर यंदा दुहेरी आकडय़ातील विक्री साधली आहे. तर मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई यांची एकेरी आकडय़ातील विक्री वाढ यंदाही कायम राहिली आहे.
मारुती सुझुकीने यंदा ८.२ टक्के अधिक विक्री करत प्रवासी वाहनांची संख्या एक लाखाच्या पल्ल्याड नेली आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या वाहनांची विक्री १,०७,८९२ झाली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीची वाहन विक्री एक लाखाच्या आत, ९९,७५८ झाली होती.
मुळच्या कोरियन बनावटीच्या ह्य़ुंदाई मोटर इंडियानेही ९.७ टक्के विक्री वाढ राखली आहे. कंपनीच्या ३७,३०५ वाहनांची विक्री यंदा झाली. ती फेब्रुवारी २०१४ मध्ये ३४,००५ होती. टाटा मोटर्सने ४०,३१४ वाहनांसह तब्बल १४.१५ टक्के विक्री केली आहे. कमी मागणी आणि कमी उत्पादनामुळे कंपनीने नुकतीच तिच्या कामगार श्रेणीसाठी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. मात्र गेल्या महिन्यात कंपनीच्या नव्यानेच सादर करण्यात आलेल्या बोल्ट तसेच यापूर्वीच्या सेदान श्रेणीतील झेस्टला उत्तम प्रतिसाद लाभला.
जपानच्या होन्डा कार्सनेही यंदा १६ टक्के विक्री वाढ राखली आहे. कंपनीच्या १६,९०२ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली.
जनरल मोटर्स, महिंद्र अॅण्ड महिंद्रूना यंदा विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे. पैकी जनरल मोटर्सने तर तब्बल २२.९५ टक्के घट नोंदविली आहे. कंपनीच्या आधीच्या तुलनेतील ५,६०७ वाहनांपेक्षा यंदा ४,३२० वाहनांची विक्रीच यंदा झाली. तर महिंद्र अॅण्ड महिंद्रने फेब्रुवारी २०१४ मधील ३९,३३८ वाहनांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ३४,९१८ वाहने विकली.
दुचाकी निर्मिती क्षेत्रात हीरो मोटोकॉर्पने ३.८५ टक्के घसरण नोंदविली आहे. कंपनीच्या फेब्रुवारीमध्ये ४,८४,७६९ वाहनांची विक्री यंदा झाली. तर स्पर्धक बजाज ऑटोमध्ये २१ टक्के घसरण नोंदली जाऊन कंपनीच्या एकूण मोटरसायकलींची विक्री २,१६,०७७ झाली. तुलनेत टीव्हीएस मोटर कंपनीच्या १,६४,५०८ वाहनांसह ११ टक्के वाढ राखली गेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
वाहन उद्योगाची आगेकूच कायम
उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतली गेल्यानंतरही सलग दुसऱ्या महिन्यात वाहन उद्योगाने विक्रीतील वाढ नोंदविली आहे.
First published on: 03-03-2015 at 07:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto industry bets on softer interest rates to propel growth