शेअर बाजारात माणूस लखपती होतो हे खरे आहे काय? असा भाबडा प्रश्न विचारणारी अनेक मंडळी मला भेटली आहेत. माझ्यापुरते सांगायचे तर याचे उत्तर होय असेच आहे, पण ते एका वेगळय़ा अर्थाने!! शेअर्समध्ये गुंतवणूक करून नव्हे तर या क्षेत्रात गेली ४५ वष्रे काम करीत असल्याने असल्याने शेकडो लेखांद्वारे वाचकांचे, शेकडो व्याख्यानांतून श्रोत्यांचे तसेच टीव्ही वाहिनीवरील माझ्या प्रेक्षकांचे जे प्रेम आजवर लाभले त्याबाबतीत मी खरेच लखपती आहे. स्व. फिरोझ जीजीभॉय यांच्या कारकिर्दीत त्या काळी असलेली नतिक बंधने पाळल्याने मी कधी शेअर्समध्ये व्यवहार केले नाहीत. व्याख्यान रंगणे, लेखन करायची उमेद वाढणे याचे श्रेय केवळ वक्त्याला तसेच लेखकाला जात नाही तर त्याहून किती तरी पटींनी जाते ते श्रोत्यांना तसेच वाचकांना. ही माझी श्रद्धा आहे हे मी नम्रपूर्वक सांगतो.
गणेश अंबोलकर यांचा प्रश्न असा आहे की, कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त पसे मला शेअर बाजारातून मिळवायचे आहेत त्यासाठी मार्ग सांगा. गणेशजी, असले काही तरी कुणी तरी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका हे मी नेहमी सांगत आलो आहे आणि मलाच तो प्रश्न तुम्ही विचारता याचे हसू आले. विश्वास ठेवा की अशी काही जादूची कांडी माझ्याकडे असती तर अशी ९३८ व्याख्याने देत देशभर कशाला फिरलो असतो? सीडीएसएलची नोकरी सोडून हेच करीत बसलो असतो!! दिगंबर गाडगीळ यांचे डिमॅट खाते कित्येक वर्षांपासून सुप्तावस्थेत आहे म्हणजेच त्यात काही व्यवहार झाले नाहीत तेव्हा ते खाते ‘डॉरमंट’ (सुप्त/निष्क्रिय) होईल अशी त्यांना भीती वाटते. याचे उत्तर म्हणजे अशी काही तरतूद डिमॅट खात्यात नाही. आपले शेअर्स सुरक्षित असतील. मात्र दीर्घ काळानंतर तुम्ही जेव्हा या खात्यात व्यवहार कराल तेव्हा सावधगिरीची सूचना म्हणून सीडीएसएल तुम्हाला एक विनामूल्य खाते उतारा तुमच्या माहितीसाठी पाठवून देईल. रत्नागिरीहून बळवंत क्षीरसागर विचारतात की, बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवण्यापेक्षा त्या बँकेचे शेअर्स घ्यावेत, असे वाटते हे बरोबर आहे का? याच विषयावरील माझा लेख गेल्या महिन्यात याच स्तंभात प्रसिद्ध झाला आहे तो वाचा. थोडे पसे फिक्समध्ये ठेवा, थोडे शेअर्स घ्या हे सयुक्तिक होईल. मात्र सर्व बँकांच्या बाबतीत हे लागू होईल असे नाही. वेबसाइटवर जाऊन संबंधित बँकेचा गेल्या दहा वर्षांतील प्रगतीचा आलेख पाहा म्हणजे निर्णय घेणे सोपे होईल.  आयसीआयसीआय बँक किंवा एचडीएफसी बँक शेअर ब्रोकर आहे मग बँक ऑफ इंडिया, युनियन बँकेसारख्या राष्ट्रीयीकृत बँका ब्रोकर का होत नाहीत, असा प्रश्न आहे अरिवद तांबेकर यांचा. वस्तुत: आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी बँक या शेअर ब्रोकर म्हणून काम करीत नाहीत. आपला हा गरसमज आहे. त्यांच्या उपकंपन्या आहेत अनुक्रमे आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि  एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड ज्या ब्रोकिंगच्या व्यवसायात आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांबाबत बोलायचे तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘एसबीआय कॅप सिक्युरिटीज लिमिटेड’ तसेच बँक ऑफ बडोदाने ‘बॉब कॅपिटल मार्केट लिमिटेड’ अशा उपकंपन्या शेअर ब्रोकिंग व्यवसायासाठी स्थापन केल्या आहेत. मात्र सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी तसे केले नाही याची कारणे अनेक असतील. पण त्यामुळे काही अडत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर बँक ऑफ इंडियाने ‘असीत सी मेहता’ या ब्रोकिंग कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. ज्यामुळे बँकेचे ग्राहक तिथे ट्रेिडग खाते उघडू शकतात. तात्पर्य कुणाही ग्राहकाला सेवेपासून वंचित ठेवलेले नाही.
महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाच्या सूचनेनुसार अनेक वाचनालयांनी आíथक साक्षरता आणि शेअर बाजार या विषयावरील माझी व्याख्याने आयोजित करायला सुरुवात केली आहे. नुकतेच कोंढे येथे रिगल वाचनालय, देवरूख येथील लोकमान्य वाचनालय इथे व्याख्याने झाली. प्रतिसाद छानच होता. लवकरच मराठी साहित्य संस्कृती मंडळ वाशी, विजय क्रीडा मंडळ भांडूप, दापोली कृषी विद्यापीठ, सार्वजनिक वाचनालय लांजा यांनीही निमंत्रणे पाठवली आहेत. पोयसर जिमखाना कांदिवलीसारखे क्लब तर समृद्ध भारत प्रतिष्ठान शहापूरसारख्या एनजीओही उपरोक्त आíथक साक्षरता कार्यक्रम आयोजित करताहेत. सर्वाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्र आíथक साक्षर होईल आणि मग ‘एका महिन्यात दुप्पट’ अशा भूलथापांना लोक बळी पडणार नाहीत अशी आशा करू या.