लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा येत्या सोमवारी संपल्यानंतर, त्याच दिवशी सायंकाळी मतदानोत्तर चाचण्या (एग्झिट पोल) जाहीर होतील आणि येणाऱ्या सप्ताहअखेरीस निकालही स्पष्ट होणार आहेत. तमाम देशवासीयांसाठी उत्सुकतेची आणि भांडवली बाजारासाठीही त्याची आगामी दिशा ठरविणारी ही महत्त्वाची राजकीय घटना आहे. हा क्षण नजीक येत असताना शुक्रवारी भांडवली बाजारानेही या घटनेबाबत दलाल व बडय़ा गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना साजेशी कामगिरी बजावली.
गुरुवारच्या किरकोळ, २० अंश वाढीनंतर शुक्रवारच्या सत्राची सुरुवात काहीशा वधारणेसह २२,३७४.९८ वर झाली. काही मिनिटांतच २२,३१७.१८ असा व्यवहाराचा तळ गाठल्यानंतर मात्र सेन्सेक्सने माघारी वळून पाहिलेच नाही. वरच्या स्तरावरचा त्याचा हा प्रवास २३ हजारापल्याड २३,०४८.४९ अंशांच्या ऐतिहासिक शिखराला स्पर्श करणारा ठरला. २३ हजार हा जादूई आकडा यापूर्वी बाजाराने गाठला नव्हता. महिन्याभरापूर्वी या ऐतिहासिक सीमेवरून तो माघारी फिरला होता.
शुक्रवारी अखेरच्या क्षणी २३ हजारापासून फारकत घेत सेन्सेक्स त्याच्या काठावर, २३,९९४.२३ वर येऊन ठेपला. गुरुवार बंदच्या तुलनेत त्याची ही झेप ६५०.१९ अंशांची राहिली. एकाच दिवसातील ही त्याची उडी १९ सप्टेंबर २०१३ नंतरची सर्वात मोठी आहे. दिवसात ६,८७१.३५ पर्यंत गेलेला निफ्टी दिवसअखेर १९८.९५ अंश वाढीसह ६,८५८.८० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांनी त्यांचे यापूर्वीचे २५ एप्रिलचे सर्वोच्च टप्पे पार केले.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या जोरदार समभाग खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्समधील २७ समभाग दणदणीत वधारले. केवळ तीन समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये ६.६३ टक्क्यांसह आयसीआयसीआय बँक आघाडीवर, तर पाठोपाठ ५.५७ टक्क्यांच्या टाटा मोटर्सचा क्रम लागला. हिंदाल्को, एचडीएफसी बँक, भेलमध्ये ५ टक्क्यांच्या वर तेजी राहिली. ५.३४ टक्क्यांसह बँक निर्देशांक क्षेत्रीय निर्देशांकात वरचढ ठरला. किरकोळ गुंतवणूकदारांकडून समभागांना मागणी राहिल्याने स्मॉल व मिड कॅप अनुक्रमे ०.७२ व १.४७ टक्क्यांनी वधारले.
बँका चमकल्या!
ऐतिहासिक टप्प्यावरील भांडवली बाजारात शुक्रवारी बँक क्षेत्रातील समभागांनी चमकदार कामगिरी बजाविली. सेन्सेक्समध्ये वरचढ ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेसह एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, स्टेट बँक यांचे समभाग मूल्य उंचावले. खासगी क्षेत्रातील येस बँकेचा समभाग तर तब्बल ९.२६ टक्क्यांसह वधारला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही बँकेक्सच आघाडीवर राहिला. १३ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी उपकरण व आरोग्यनिगा निर्देशांक नकारात्मक स्थितीत राहिले.
बँकेक्स निर्देशांक : १५,७२१.३६ (+५.३४%)
येस बँक : रु. ४८३.९५ (+९.२६%)
आयसीआयसीआय बँक : रु. १,३७४.८५ (+६.६३%)
एचडीएफसी बँक : रु. ७५७.२० (+५.३१%)
पीएनबी : रु. ८१८.९५ (+४.९४%)
अॅक्सिस बँक : रु. १,६३१.५० (+४.८७%)
कोटक महिंद्र : रु. ८५१.८५ (+४.७५%)
इंडसइंड बँक : रु. ५१३.६५ (+४.६१%)
बँक ऑफ इंडिया : रु. २४२.७५ (+४.१८%)
स्टेट बँक : रु. २,१७२.७० (+३.८८%)
कॅनरा बँक : रु. २८६.१० (+३.७०%)
फेडरल बँक : रु. ९५.३० (+३.६४%)
बँक ऑफ बडोदा : रु. ८२९.९० (+२.६२%)
‘वंडरेला’ वंडर्स!
बंगळुरूची मनोरंजन उद्याने चालविणारी कंपनी वंडरेला हॉलिडेज्ने बऱ्याच काळानंतर ३८ पटीहून अधिक भरणा झालेली दमदार यशस्वी भागविक्री दोन आठवडय़ांपूर्वी पूर्ण केलीच, पण शुक्रवारी बाजारातील सूचिबद्धतेला म्हणजे पदार्पणालाच तब्बल ३६ टक्क्यांचा फायदाही दाखविणारी नवलाईही साधली. ११५ रु. ते १२५ रु. किंमत पट्टय़ादरम्यान विक्री झालेल्या या समभागाचे आज शेअर बाजारात सूचिबद्धतेनंतर नियमित खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. समभागाने १६४.७५ रुपये स्तरावर पहिला सौदा नोंदविला, तर दिवसभरात त्याने १७० रुपयांचा उच्चांक दाखविला. या भागविक्रीतून प्राप्त सुमारे १८० कोटींच्या भांडवलातून कंपनी हैदराबाद येथे आपले तिसरे मनोरंजन उद्यान उभारणार आहे. दिवसअखेर समभागाने १५६.५० या स्तरावर (तरी १२५ रुपयांच्या विक्री किमतीपेक्षा २५% फायद्यावर) विराम घेतला.
निवडणूक निकालाचा दिवस नजीक येत असताना भांडवली बाजारातील व्यवहार हे केंद्रात स्थिर सरकारच्या आशेवर झाले आहेत.
* दिनेश ठक्कर, अध्यक्ष, एंजल ब्रोकिंग
निकालाचा दिवस येत्या आठवडाअखेर असला तरी बाजाराची नजर आता मतदानोत्तर चाचण्यांच्या कलावर असल्याची दिसून येते.
* संजीव झारबडे, उपाध्यक्ष, कोटक सिक्युरिटीज
मोदी लहरींवरील भांडवली बाजाराचा प्रवास अजून काही काळ राहण्याची शक्यता आहे. बँकसारख्या वित्त क्षेत्राच्या जोरावर शुक्रवारचे व्यवहार नोंदले गेले.
* राहुल शहा, उपाध्यक्ष, मोतीलाल ओस्वाल सिक्युरिटीज