विदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजाराकडील ओघ पुन्हा सुरू झाला असून त्याने प्रमुख निर्देशांकांना बुधवारी महिन्याच्या वरच्या टप्प्याला नेऊन ठेवले. आघाडीच्या ब्ल्यू चिप समभागांना मागणी राहिल्याने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने दोन शतकांची वाढ नोंदविली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने बुधवारच्या जवळपास अर्धशतकी वाढीमुळे ८,४०० हा अनोखा टप्पा पार केला.
१९१.६८ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,८३७.२१ वर पोहोचला. ५७.६० अंश भर घालत निफ्टी ८,४२३.२५ पर्यंत गेला. २२ एप्रिलनंतर सेन्सेक्स २७,८००च्या पुढे गेला आहे.
बुधवारच्या व्यवहारामार्फत बाजारावरील विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा दिसून आला तर व्याजदर कपातीच्या आशेने संबंधित बँक आदी समभागांचे मूल्य उंचावले. सेन्सेक्समध्ये मंगळवारी ४२ अंशांची घसरण नोंदली गेली होती.
सेन्सेक्समधील एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज, स्टेट बँक, सन फार्मा, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा पॉवर आदींमध्ये मागणी नोंदली गेली. प्रमुख निर्देशांकांतील १८ समभाग तेजीत राहिले. तर ११ मध्ये घसरण व एकच, हिरो मोटोकॉर्प स्थिर राहिला. वाढलेल्या समभागांचे मूल्य २ टक्क्यांपेक्षा अधिक होते. तर क्षेत्रीय निर्देशांकात जवळपास दोन टक्क्यांसह माहिती तंत्रज्ञान वरचढ ठरला.
रुपया पुन्हा ६४ नजीक!
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी घसरण नोंदवीत पुन्हा एकदा ६४च्या तळानजीकचा प्रवास नोंदविला. मंगळवारच्या ६३.६७ च्या तुलनेत रुपया १५ पैशांनी घसरत ६३.८२ पर्यंत घसरला. मंगळवारी त्यात अवघ्या पाच पैशांची भर पडली होती. बुधवारच्या व्यवहारात त्याने ६३.८८ पर्यंत घसरण नोंदविली.