एरवी रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाच्या अंदाजावर सावध हालचाल नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने सप्ताहरंभी प्रचंड उसळीची खेळी खेळली. तीन आठवडय़ातील सर्वात मोठी अंश झेप सेन्सेक्सने पतधोरण पूर्वसंध्येला नोंदविली. स्थिर व्याजदराच्या अटकळीवर गुंतवणूकदारांनी मुंबई निर्देशांकावा २४ हजार ५०० च्या पुढे नेऊन ठेवले. तर सव्वाशेहून अधिक अंश वाढीमुळे निफ्टी ७,३५० पर्यंत पोहोचू शकला.
शुक्रवारच्या तुलनेत १.९३ टक्क्य़ांची सोमवारची सेन्सेक्स उडी ही १२ मेनंतरची सर्वात उंच ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही गेल्या सप्ताहअखेरपेक्षा १.८३ टक्के उंच राहिला.
नव्या सरकार दफ्तरी हजेरी लावणारे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे मंगळवारी तिमाही पतदोरण जाहिर करणार आहेत. त्या पाश्र्वभूमिवर बाजारात महिन्याच्या व्यवहारातील पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी उत्साह दर्शविला. परिणामी सत्रअखेर सेन्सेक्सला आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवतानाच निर्देशांक अंश उडीही गेल्या तीन आठवडय़ाच्या सर्वात वरच्या टप्प्यावर पोहोचली.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओळखला जाणारा मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे २.१६ व २.०१ टक्क्य़ांनी वधारला.
सोने २७ हजाराच्या खाली
भांडवली बाजाराइतकीच मोठी हालचाल सोमवारी सराफा बाजारातही उमटली. सोन्याचा भाव आता तोळ्यासाठी २७ हजार रुपयांपासूनही मागे गेला असून चांदीचा किलोचा दरही ४० हजारांच्या आसपास घटमळू लागला आहे. शहरात सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी जवळपास २०० रुपयांनी कमी होत २७ हजार रुपयांच्या आत येऊन विसावले. स्टॅण्डर्ड प्रकारचे सोने २६,८४० तर शुद्ध सोन्याचा दर १० ग्रॅमसाठीच २६,९९० रुपयांवर आला. किलोसाठी चांदी १६० रुपयांनी कमी झाल्याने ती आता ४०,६७० रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे.
रुपयाचे दुर्लक्ष
भांडवली बाजारातील अभूतपूर्व तेजीकडे पूर्णत: दुर्लक्ष करत परकी चलनावरील रुपयाचा प्रवास सोमवारी नकारात्मक राहिला. डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहांरभी ४ पैशांनी रोडावत ५९.१५ पर्यंत आला. आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात चलन ५९.२९ पर्यंत खाली आले. सलग तिसऱ्या व्यवहारात त्यात घसरण नोंदली गेलीे.