मागील शुक्रवारी याच स्तंभातून आíथक साक्षरता मेळावे विनामूल्य आयोजित करण्याचे जाहीर करताच निमंत्रणांचा पाऊस पडला. याचे कारण आजवर अशा प्रकारचे मेळावे कुणी विनामूल्य करीत असेल यावरच लोकांचा विश्वास नव्हता. माझा प्रवास तसेच निवास इत्यादी सर्व खर्च सीडीएसएल करीत असते हे सविस्तर लिहूनही काहींकडून आश्चर्यकारकरीत्या मुद्दाम प्रश्न विचारून खातरजमा केली गेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन आले. व्याख्यानमाला मंडळांकडून कार्यक्रमाची विचारणा झाली. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव अभ्यंकर यांनी खास फोन करून लेखाबद्दल अभिनंदन केलेच, पण एका प्रख्यात ज्ञाती संस्थेच्या मुखपत्रात विशेष लेख लिहून द्या असा आग्रह धरला. परवाच एका समारंभात चेंबूर येथे राहणाऱ्या सुविद्य भगिनी भेटल्या. माझ्या एका व्याख्यानाला त्या आल्या होत्या सुमारे दोन वर्षांपूर्वी. काही माणसे लक्षात राहतात त्यांच्या काही खास गुणवैशिष्टय़ांमुळे. या भगिनी लक्षात राहिल्या होत्या त्या अशासाठी की माझे व्याख्यान सुरू असताना अखंडपणे मोबाइलवर चाळा सुरू होता. तिसऱ्या रांगेत बसल्या असल्याने मला ते सहज दिसत होते. अशा वेळी एक अव्यक्त पण मानसिक त्रास होतोच. कारण आपण पोटतीडिकेने सांगत असताना समोरील व्यक्ती बेफिकीरपणे वागत असेल तर ते खटकते. शिवाय ते सभ्यतेच्या मर्यादा सोडून आहे हे नक्कीच. इतके तुम्ही व्यस्त असाल तर येऊ नये व्याख्यानाला. नेहमीप्रेमाणे मी ‘‘ब्रोकरने पाठवलेल्या काँट्रॅक्ट नोट तपासून पाहा, तुम्ही न सांगता ब्रोकरने काही व्यवहार केले असतील तर तत्काळ स्टॉक एक्स्चेंजकडे तक्रार करा’’ वगरे माहिती सांगत होतो. ईमेलद्वारे काँट्रॅक्ट नोट येतात तेव्हा रोज ई-मेल तपासत जा हेही मी सांगत होतो. तथापि वर लिहिल्यानुसार ताई मोबाइलमध्ये दंग असल्यामुळे ते ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. परवा त्या भेटल्या तेव्हा सर्वसाधारण लोकांच्या तक्रारी असतात तशीच यांचीही तक्रार. मी ब्रोकरकडे दहा हजार रुपये ठेवले होते ते त्याने खलास करून टाकले अणि आता फक्त ७२० रुपये शिल्लक आहेत! खलास कसे झाले तर शेअर्स विकत घेतले, विकले आणि बाजार खाली असल्याने नुकसान झाले. हे सर्व व्यवहार झाले ते या भगिनींनी फोनवरून सूचना द्यायची सवय लावली होती ब्रोकरला म्हणून. बरे जे व्यवहार बाईंच्या सूचनेवरून झाले ते ठीक, पण सूचना न देता ब्रोकरने काही व्यवहार केले होते तर मग स्टॉक एक्स्चेंजकडे तक्रार का केली नाही यावर त्यांचे उत्तर की, मला काँट्रॅक्ट नोट मिळालीच नाही. कारण काय तर म्हणे माझा याहूचा मेल आयडी बंद करून बदलून मी गुगलचा मेल आयडी सुरू केला. बरे हा बदल ब्रोकरला कळवला का? नाही, हे त्याचे उत्तर. त्यामुळे ब्रोकरने जुन्या मेलवर पाठविलेले संदेश परत गेले. यात ब्रोकरचा दोष नाही कारण नवीन मेल आयडी ब्रोकरला कळवायची तसदी घेतली नाही! आता यात चूक कुणाची? ‘‘ते स्टॉक एक्स्चेंजकडे तक्रार करायचे मला माहीत नव्हते’’ इत्यादी वक्तव्य ऐकल्यावर मात्र मी बिथरलो. ‘‘ताई तुम्ही चेंबूरला माझ्या व्याख्यानाला आला होतात तेव्हा मोबाइल जरा बाजूला ठेवला असतात तर ही वेळ आली नसती!’’ हे ऐकताच त्या चक्रावून गेल्या, कारण ही सत्य परिस्थिती होती. माझ्या स्मरणशक्तीचे त्या करीत असलेले कौतुक ऐकण्यात मला काडीचाही रस नव्हता. कधी कधी आपले काही गुण आपल्यालाच त्रासदायी ठरतात ते असे. पाच वर्षांपूर्वी पुणे येथील एका व्याख्यानात एका भगिनीने तक्रार केली की मी ब्रोकरच्या कार्यालयात गेले की ब्रोकर माझे बोलणे ऐकून घेतानाच मध्ये थांबून त्याला आलेल्या फोनवरील व्यक्तीशीच बोलत राहतो, त्यामुळे माझ्या कामाकडे त्याचे दुर्लक्ष होते. याबाबत सेबीचा काय नियम आहे? वस्तुत: अशा किरकोळ बाबींसाठी नियम कसे असतील? असा जगावेगळा प्रश्न विचारणारी व्यक्ती लक्षात न राहती तरच नवल. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी पुणे येथेच पण दुसऱ्या एका सभागृहात कार्यक्रम होता. तिथे याच भगिनी आल्या होत्या आणि परत तोच प्रश्न विचारला. मी मुंबईकर असूनही माझ्यात एक स्पष्टवत्तेपणाची उबळ निर्माण झाली आणि त्या भगिनींना मी म्हटले की, ‘‘ताई, हाच प्रश्न तुम्ही तीन वर्षांपूर्वी हर्षल हॉलमधील माझ्या व्याख्यानात विचारला होतात आणि मी उत्तरदेखील दिले होते!’’
आनंदकुमार मानूसमारे यांच्या आईच्या नावे बँक ऑफ इंडियाचे १०० शेअर्स सर्टििफकेट स्वरूपात आहेत ते मुलाच्या नावे रीमॅट करायचे आहेत, त्याची प्रक्रिया विचारली आहे. सर्टििफकेटरूपी शेअर्सचे डिमॅट होते, रीमॅट नाही. रीमॅटचा अर्थ असा की तुमच्या डिमॅट खात्यातील शेअर्सच्या ऐवजी परत त्याचे सर्टििफकेटमध्ये रूपांतर करून घेणे. तुमच्याकडे तर अगोदरच सर्टििफकेटच आहेत. आईच्या नावावर असलेले शेअर सर्टििफकेट तुमच्या नावावर हस्तांतरित करायचे असेल, तर शेअर ट्रान्सफर फॉर्म भरून त्यावर १०० रुपयाला २५ पसे या दराने स्टॅम्प डय़ुटी भरून कंपनीच्या ‘आरटीए’कडे पाठवणे. सुमारे १५ दिवसांत हे काम होते.