मनोरंजन उद्योगाची आशियातील सर्वात मोठी ‘फिक्की फ्रेम्स २०१३’ परिषद १२ मार्चपासून तीन दिवस मुंबईतील हॉटेल रेनेसान्स येथे होत असून यंदाचे परिषदेचे १४ वे वर्ष आहे, अशी माहिती फिक्की फ्रेम्स समितीचे अध्यक्ष व स्टार इंडिया नेटवर्कचे प्रमुख उदय शंकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. या वेळी धर्मा प्रॉडक्शन्सचे प्रमुख व आघाडीचे निर्माते करण जोहर उपस्थित होते.
माध्यम व मनोरंजन उद्योगाला (एम अ‍ॅण्ड ई) पोषक ठरेल असे वातावरण निर्माण करण्याबरोबरच उद्योगावरील कर समयोचित असावेत जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या वेगवान प्रगतीसाठी ते सहाय्यभूत ठरू शकेल, असे मत उदय शंकर यांनी या वेळी व्यक्त केले. सेट टॉप बॉक्सवरील प्रचंड आयातशुल्क कमी करावे, मनोरंजन कर कमी करावा अशी मागणीही उदय शंकर यांनी यानिमित्ताने सरकारकडे केली आहे.
१२ ते १४ मार्च दरम्यान होणाऱ्या यंदाच्या ‘फिक्की फ्रेम्स २०१३’साठी ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी : एंगेजिंग ए बिलियन कन्झ्युमर्स’ अशी संकल्पना ठरविण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत माध्यम व मनोरंजन उद्योगाने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट, टीव्ही कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर दिल्याने ग्राहकसंख्येत प्रचंड वाढ झाली. ज्या लोकांपर्यंत मनोरंजन उद्योगाला पोहोचता आलेले नाही, त्यांच्यापर्यंत त्यांना आवडतील असे कार्यक्रम, उपक्रम, चित्रपट पोहोचावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही उदय शंकर यांनी मांडले.
‘फिक्की फ्रेम्स २०१३’ परिषद ही माध्यम व मनोरंजन उद्योगासाठी मैलाची दगड ठरणार असून त्यातील विविध परिसंवाद, चर्चा, कार्यक्रमांद्वारे आगामी काळातील माध्यम व मनोरंजन उद्योगाच्या वाटचालीला दिशा मिळू शकेल, असा विश्वास निर्माता व फिक्की फ्रेम्स समितीमधील करण जोहर यांनी व्यक्त केला.  माध्यम व मनोरंजन क्षेत्राकडे देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठे योगदान देण्याबरोबरच सामाजिकदृष्टय़ा बदल घडवून आणण्याची क्षमताही आहे, असेही करण जोहर यांनी नमूद केले.