एचडीएफसी या गृहवित्त पुरवठा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीने गृहकर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्याने वाढविले आहेत. कंपनीच्या नव्या दरांची अंमलबजावणी १ डिसेंबरपासूनच लागू झाली आहे.
यानुसार ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा वार्षिक व्याजदर १०.५० टक्के तर ३० ते ७५ लाख रुपयांपर्यंत कर्जाचा व्याजदर वार्षिक १०.७५ टक्के असेल. आता गृहकर्जावरील वाढीव व्याजदराचा कित्ता अन्य बँकांमार्फतही अवलंबला जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरअखेर रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरवाढ पाव टक्क्याने केल्यानंतर अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदर कमी केले होते.
आगामी कालावधीत महागाई कमी होताच व्याजदर पुन्हा कमी होणे सुरू होईल, असा विश्वास यानिमित्ताने कंपनीचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी व्यक्त केला. येत्या १८ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात मध्यवर्ती बँक दर कमी करेल, असेही ते म्हणाले. यंदा मान्सून चांगला झाला असल्याने कृषी व खाद्य उत्पादन महिनाअखेर प्रत्यक्षात येऊन त्यामुळे महागाई कमी होईल आणि परिणामी बँकांचे व्याजाचे दर कमी होतील, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc bank home loan increase