सनदी लेखा व्यवसायाने बांधिलकी व समर्पणाची नवीन क्षितिजे कवेत घेताना अधिकाधिक विश्वासार्हता, समयोचितता आणि अपेक्षांचे पुल बांधायला हवेत, असा शब्दात केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अश्विनी कुमार यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींना आवाहन केले.
छोटय़ा-बडय़ा ग्राहकांच्या विविध चिंतांचे समाधान शोधताना, लेखा व्यावसायिक उच्च कोटीची मूल्यनिष्ठा आणि शाश्वत तत्वांशी कायम इमान पाळत आले आहेत, असेही अश्विनी कुमार यांनी या पेशाबद्दल काढले. व्यासपीठावर आयसीएआयचे अध्यक्ष सीए जयदीप एन. शाह, उपाध्यक्ष सीए सुबोध कुमार अग्रवाल आणि सचिव टी. कार्तिकेयन हे उपस्थित होते. ‘लेखा व्यावसायिकांची आर्थिक वृद्धीला मदतकारक भूमिका’ असाच चर्चेचा मुख्य आशय असलेल्या या परिषदेत, २०२० साली भारतातील लेखा सेवांची मागणी आणि आकांक्षापूर्ती असे एक महत्त्वाचे चर्चासत्रही झाले. अन्य अनेक तांत्रिक विषयांवरील चर्चासत्रात लेखा व्यवसायातील विचारप्रणेते, वित्त व वाणिज्य क्षेत्रातील धुरीण, शिक्षणवेत्ते, संशोधक आणि देशविदेशातील तज्ज्ञ व्यावसायिक सामील झाले होते. ‘आयसीएआय’ भारतात ‘अकाऊंट्न्सी’चे व्यावसायिक व कालसुसंगत दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्याबरोबरच, आपल्या सदस्यांना नव्या घडामोडी व फेरबदलांशी अवगत करण्यास हातभार लावत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honest important in audit professional ashwani kumar