‘एनडीबी’चे अध्यक्ष के व्ही कामथ यांचे मत
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत हतोत्साही कयास बांधतानाच, दोन अंकी विकासदराचे लक्ष्यही लवकरच गाठले जाईल, असा विश्वास ‘ब्रिक्स’ राष्ट्रांनी एकत्र येऊन स्थापलेल्या ‘नव विकास बँक (एनडीबी)’चे पहिले अध्यक्ष के. व्ही. कामथ यांनी व्यक्त केला. तथापि, भारताच्या बँकिंग क्षेत्रातील बुडीत कर्जे (एनपीए)चा अतिरिक्त बाऊ केला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतातील सध्याची बुडीत कर्जाच्या प्रमाणाबाबत केवळ गदारोळ माजविला जात आहे, त्याऐवजी नेमके उपाय शोधण्याचा प्रयत्न हवा, असे कामथ यांनी सूचित केले. बँकांच्या बुडीत कर्जाबाबत चीनशी तुलना करताना त्यांनी सांगितले की, २००२ साली चीनच्या बँकांमधील एनपीएचे प्रमाण ५५० अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे तत्कालीन त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) निम्म्यावर पोहोचले होते. आज चीनमध्ये सर्व एनपीए खाती स्वच्छ व निरंक झाली आहेत. त्याउलट भारतातील बुडीत कर्जाचे प्रमाण हे जीडीपीच्या ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय उद्योग महासंघ- सीआयआयने चीन आणि भारतादरम्यान द्विपक्षीय व्यापार व आर्थिक संबंध सुदृढ करण्यासाठी सोमवारी सायंकाळी मुंबईत आयोजित केलेल्या समारंभासाठी कामथ यांची विशेष उपस्थिती होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मोदी सरकारची वाटचाल योग्य मार्गावर सुरू असून, बँकांच्या बुडीत कर्जासह सर्व प्रलंबित मुद्दय़ांचे लवकरच निवारण सरकारकडून केले जाईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला मुक्तपणे व वेगाने भरारी घेण्यासाठी आवश्यक ते बदल सरकारकडून राबविले जात असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले.
भारतातील शाश्वत पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी अनेक वित्तीय संस्थांबरोबर आर्थिक पाठबळासाठी सामंजस्य करार ते नेतृत्व करीत असलेल्या एनडीबीकडून लवकरच केले जातील, असेही त्यांनी सूचित केले.