किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या प्रस्तावावर संसदेत बुधवारी उशिरा होणाऱ्या मतआजमावणीवर सकारात्मकतेने डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा क्रम कायम ठेवल्याने ‘सेन्सेक्स’ दीड वर्षांपूर्वीच्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला. तर ‘निफ्टी’ने ५,९०० ही महत्त्वाची तांत्रिक पातळी पार केली. प्राथमिक माहितीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारी ८८० कोटी रुपयांची खरेदी केली आहे. याचा फायदा आज रुपयाही अधिक भक्कम होण्यास झाला.
मल्टीब्रॅण्ड रिटेलमध्ये ५१ टक्क्यांपर्यतच्या थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्ताराबाबतचा प्रस्ताव संसदेत सायंकाळी उशिरा मांडण्यात आला. मात्र तत्पूर्वीच भांडवली बाजार तो सुकर होण्याच्या आशेवर स्वार झाला होता. कालच्या सत्राइतकीच ‘सेन्सेक्स’ने आज कमाई केली असली तरी त्यातून निर्देशांक १९,४०० नजीक पोहोचला. यापूर्वी निर्देशांकाने २७ एप्रिल २०११ मध्ये १९,४४८.६९ अशी पातळी गाठली होती.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’नेही बुधवारी अवघी ११.२५ अंशांची वाढ नोंदविली. मात्र यामुळे हा निर्देशांकही ५,९०० ही तांत्रिक अडसर असलेली पातळी ओलांडता झाला. ६,००० कडे कूच करणारा हा टप्पा ‘निफ्टी’तील गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ‘सेन्सेक्स’मधील १५ कंपन्यांचे समभाग मूल्य आज वधारले. यातही बांधकाम, पोलाद, तेल व वायू हे क्षेत्रीय निर्देशांक उंचावले. दरम्यान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना घसरणीचा सामना करावा लागला. इन्फोसिससह विप्रोचे समभाग मूल्य घसरले. तर वाहन क्षेत्रात बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रूला घसरण अनुभवावी लागली.    
रुपयाही उंचावला
किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे पाहून बुधवारी स्थानिक चलनही १४ पैशांनी उंचावले. डॉलरच्या तुलनेत रुपया ५४.५४ पातळीपर्यंत त्यामुळे सुधारला. गेल्या अनेक सत्रांपासून ५७ च्या खाली प्रवास करणारा रुपया बुधवारी भांडवली बाजारात विदेशी गुंतवणुकीच्या ओघाने भक्कम झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिटेल शेअर्समध्ये घाऊक वाढ
शॉपर्स स्टॉप     रु. ४६३.६५     ७.३%
ट्रेन्ट    रु. १२७०.७५     ४.३%
पँटलुन रिटेल    रु. २३७.८५     ३.३%
प्रोव्होग इंडिया    रु. १७.२५     ६.१%
कुटॉन्स रिटेल    रु. ९.५१     ५%

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifti 5900 and sensex on top after one anf half years