दुसऱ्या तिमाहीच्या पूर्वसंध्येला जारी करण्यात आलेल्या पतधोरण आढाव्यात महागाई वाढीबद्दल चिंता व्यक्त करत, व्याज दरवाढीचा एक फेरा पुन्हा चालविण्याचे संकेत रिझव्‍‌र्ह बँकेने दिले. याचबरोबर चालू आर्थिक वर्षांचा विकास दरही खुंटविण्यात आला आहे.
आर्थिक वर्षांचे दुसरे तिमाही पतधोरण डॉ. रघुराम राजन हे मंगळवारी सकाळी जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी परंपरेप्रमाणे सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या आढाव्यात महागाई ही वाढतच असून, तिच्यावरील दबाव हा धोरण निश्चिततेवरही उमटत असल्याचे बँकेने म्हटले आहे. त्याचबरोबर केवळ पतधोरण हेच अर्थविकासाला चालना देऊ शकत नाही, असे नमूद करून रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपातीची शक्यता नाकारली आहे. महागाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे नमूद करून पतधोरण आढाव्याने, खाद्यान्य तसेच इंधन दरांचे महागाईमध्ये प्राबल्य असल्याचे नमूद केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्याही पतधोरणात पाव टक्का रेपो दरवाढ केली होती. यंदाही वाढती महागाई पाहता याच प्रमाणात दरवाढ उद्योग वर्तुळानेही अपेक्षिली आहे.
पतधोरण आढाव्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्था वाढीचा दर पूर्वीच्या भाकीतांपेक्षा ०.९ टक्के कमी अंदाजला आहे. यानुसार २०१३-१४ साठी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन ४.८ टक्के असेल. गेल्या महिन्यातील महागाई ही सलग चौथ्या महिन्यात विस्तारली व सातव्या महिन्याच्या वरच्या टप्प्यावरची राहिली आहे. यंदाच्या चांगल्या मान्सूननंतर दुसऱ्या अर्ध आर्थिक वर्षांत महागाई समाधानकारक पातळीवर येईल, असा मध्यवर्ती बँकेला विश्वास आहे. संपूर्ण वर्षांत महागाई आधीच्या ५.३% अंदाजापेक्षा अधिक, ६ टक्के असेल असे नमूद केले आहे.
व्याज दरवाढीसाठी..
सप्टेंबरमध्ये घाऊक तसेच किरकोळ किंमत निर्देशांक अनुक्रमे ६.४६ व ९.८४ टक्के राहिला आहे. यामध्ये अन्नधान्याची दरवाढ याच कालावधीत १८.४० टक्के व मुख्य महागाई निर्देशांक (अन्नधान्य व इंधन महागाई वगळता) २.११ (घाऊक) व ८.२९ (किरकोळ) नोंदला गेला आहे. हे पाहता यंदा व्याज दरवाढीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेला पुरेसे निमित्त मिळू शकते.
व्याज कपातीसाठी..
वाढती महागाई हे व्याज दरवाढीला सबळ कारण असले, तरी गेल्या काही कालावधीतील कमी होत जाणारी व्यापार तूट व पतपुरवठा वाढ या बाबीही व्याजदर कपातीसाठी निमित्त ठरू शकतात, असाही एक कल आहे. मात्र दशकात नीचांक (४.८%) नोंदविणाऱ्या विकास दराने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतही ४.४ अशीच सुमार कामगिरी नोंदविली आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थतज्ज्ञांचा दरवाढीचा कयास
देशातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञ, विश्लेषक आणि उद्योगक्षेत्रात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात रेपो दरात रिझव्‍‌र्ह बँकेकडून पाव टक्क्य़ांनी वाढ केली जाईल, अशा मताचे पारडे जड असल्याचे दिसून येते. ‘आरबीएस’ या वित्तसंस्थेने त्याचप्रमाणे ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून करण्यात आलेल्या पाहणीत बहुतांशांनी रेपो दर किमान पाव टक्क्य़ाने वाढतील, असा अंदाज वर्तविला आहे. ब्लूमबर्गने केलेल्या पाहणीत देशातील आघाडीच्या २४ पैकी २० अर्थतज्ज्ञांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे रेपो दर पाव टक्क्य़ाने वाढवून ७.७५ टक्क्य़ांवर नेतील, अशी शक्यता वर्तविली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi monetary policy review raghuram rajan hints at hike in interest rate no diwali bonus for india