पात्र संस्थांगत गुंतवणूकदारांना भागविक्री करून आजवरचा सर्वात मोठा म्हणजे ८,०३१.६४ कोटी रुपयांचा निधी उभारणाऱ्या स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य मात्र भागविक्रीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फारशा खूश दिसल्या नाहीत.
त्यांच्या मते आणखी आठवडाभर उशिराने ही भागविक्री झाली असती तर अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकला असता.
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेला या २८ आणि २९ जानेवारीला झालेल्या संस्थागत भागविक्रीतून ९,६०० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात शुक्रवारी ८,०३२ कोटी रुपये उभारण्यात आल्याचे बँकेने जाहीर केले. बँकेने या माध्यमातून ५.१३ कोटी समभागांची प्रत्येकी १,५६५ रुपये सरासरी भावाने विक्री केली. तथापि सरकारच्याच मालकीच्या आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ने सुमारे ३,००० कोटींची तर अन्य सार्वजनिक बँकांकडून आणखी २,००० कोटींच्या झालेल्या खरेदीने या भागविक्रीला तारलेले दिसून आले.
या भागविक्रीबाबत जागतिक अर्थसंस्था आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांमध्ये उत्सुकता निश्चितच होती. परंतु, अर्जेटिना आणि तुर्कस्तानातील चलन संकटाने गढूळ बनलेले वातावरण, त्यातच अमेरिकेच्या फेडकडून द्रवतापूरक रोखे खरेदी आटली जाईल असा घेतला गेलेला निर्णय मारक ठरला, असे अरुंधती भट्टाचार्य यांनी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिपादन केले. तथापि या भागविक्रीपश्चात स्टेट बँकेच्या भांडवली पर्याप्तता प्रमाणाला १३.२ टक्के पातळीवर नेणारा अपेक्षित परिणाम साधला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शुक्रवारी स्टेट बँकेच्या समभागानेही ०.४१ टक्क्यांनी उसळी घेत १,५२३.७५ रुपयांवर उडी घेतली.