बुधवारच्या संमिश्र हालचालींनंतर प्रमुख भांडवली बाजाराने गुरुवारी काहीशी अधिक अंशवाढ राखली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९.१० अंश वाढीसह २०,२६१.०३ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१.५० अंश वधारणेसह ६,०२२.४० पर्यंत पोहोचला. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने किरकोळ वाढ, तर निफ्टीने किरकोळ घसरण नोंदविली होती. असे करताना सेन्सेक्स गेल्या चार महिन्यांच्या तळातून सावरला, तर निफ्टी सहा हजारांच्या उंबरठय़ावर स्थिरावला.गुरुवारी बाजारात सुरुवातीला कंपनी समभागांवर काहीसा दबाव निर्माण झाला. परिणामी, सेन्सेक्स व्यवहारात २०,०७६.१० या दिवसाच्या नीचांकावरही आला. मध्यंतरानंतर माहिती तंत्रज्ञान, वाहन, बांधकाम क्षेत्रातील समभागांनी तेजीत भर घातली.
रुपया पुन्हा घसरला
सलग दोन दिवस सशक्त बनलेले भारतीय चलन बुधवारी ४ पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत रुपया ६२.५७ पर्यंत रोडावला. चलन व्यासपीठावर बुधवारी रुपया ६२.४२ या उच्चांकावर रुजू झाला. ६२.३५ या दिवसाच्या उच्चांकापर्यंतही तो गेला. अखेरच्या टप्प्यात चलनात ६२.६२ हा दिवसाचा तळ गाठल्यानंतर तो मंगळवारच्या तुलनेत ०.०६ टक्क्याने घसरला. तत्पूर्वी गेल्या सलग दोन व्यवहारांत रुपया १५ पैशांनी वधारला होता.