मुंबई : जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतांनंतरही, सत्रअखेरच्या शेवटच्या तासात झालेल्या समभाग खरेदीने सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात वाढीचा क्रम कायम राहू शकला. भांडवली बाजाराने गुरुवारच्या सत्राची सुरुवात मात्र नकारात्मक केली होती.

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कोटक बँक, लार्सन अँड टुब्रो आणि भारती एअरटेलच्या समभागांची गुंतवणूकदारांनी अखेरच्या तासात खरेदी केली गेल्याने, दिवसभरातील नकारात्मकतेतून सावरण्याचे निर्देशांकांना बळ मिळाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३७.८७ अंशांनी वधारून ६०,२९८ पातळीवर बंद झाला. सत्रात सेन्सेक्सने ६० हजार अंशांची पातळी मोडत ५९,९४६.४४ अंशांचा दिवसातील नीचांकी स्तर दाखविला होता. मात्र त्या पातळीपासून सुमारे ३५० अंशांनी सावरत सेन्सेक्सने पुन्हा ६० हजारांपुढे बंद पातळी नोंदविली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२.२५ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो १७,९५६.५० अंशांच्या पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर महागाईचा पारा किंचित उतरला असला तरी अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने अमेरिकेतील चलनवाढीचा स्तर अद्याप उच्च असल्याचे म्हणत, व्याजदरात वाढीसंबंधी आक्रमकता ओसरली नसल्याचे संकेत दिले. परिणामी जागतिक बाजारांसह देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफावसुलीला प्राधान्य दिले. अमेरिकी भांडवली बाजारातील घसरणीचे पडसाद देशांतर्गत बाजारातील माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण कंपन्यांच्या समभागावर उमटले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, स्टेट बँक आणि आयटीसीचे समभाग तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, विप्रो, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँक आणि नेस्लेच्या समभागांत सर्वाधिक घसरण झाली.

‘बीएसई’च्या बाजार भांडवलाचा विक्रम

मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाने २८०.५४ लाख कोटींचा ऐतिहासिक उच्चांकी टप्पा गुरुवारच्या सत्रात गाठला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदीचा वाढलेला जोर आणि महागाई कमी झाल्याने आक्रमक व्याज दरवाढीला चाप लागण्याची आशा निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्देशांकांच्या सलग घोडदौडीतून दिसून येत आहे. याआधी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांनी एकत्रित बाजार भांडवलात २८०.३ लाख कोटींचे शिखर चालू वर्षांत १७ जानेवारी २०२२ ला गाठले होते.