मुंबई निर्देशांकात ४६० अंश उसळी; तर निफ्टीचा ७,९०० नजीक स्तर
सोने खरेदीसाठी एक असलेला मुहूर्त सोमवारी भांडवली बाजारासाठीदेखील सकारात्मक ठरला. ४६० अंशांच्या रूपात गेल्या महिन्याभरातील एकाच सत्रातील सर्वात मोठी झेप नोंदवीत सेन्सेक्सने नव सप्ताहारंभी २५,७०० नजीकची मजल मारली, तर १३२.६० अंशवाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८६६.०५ वर पोहोचला. शतकाहून अधिक अंशवाढीने निफ्टीला ७,९०० नजीकची मजल सोमवारी मारता आली.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत व्याजदर स्थिर ठेवण्याच्या आशेने भांडवली बाजाराला पुन्हा गती प्राप्त झाली. जोडीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची वाढअपेक्षाही बाजारात दिसली. जवळपास ५०० अंशांची मुंबई निर्देशांकाची सोमवारची एकाच व्यवहारातील उसळी ही गेल्या चार आठवडय़ांतील सर्वात मोठी ठरली.

अमेरिकेच्या लवकरच जाहीर होणाऱ्या रोजगारविषयक आकडेवारीवरून बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ही आकडेवारी फारशी समाधानकारक न राहिल्यास त्या देशातील मध्यवर्ती बँकेला तूर्त व्याजदर वाढ करता येणार नाही, या अंदाजाने येथे गुंतवणूकदारांनी समभागांची वाढती मागणी नोंदविली, तर ग्रीसमधील वित्तीय संकट अधिक गहिरे होत असताना युरोपीय बाजारात पडझड नोंदली गेली.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्स २५,३२१.८३ या वरच्या टप्प्यावर होता. सत्रात तो २५,७०९.६८ पर्यंत झेपावला. दिवसअखेरची त्याची सत्रवाढ ही १३ एप्रिलनंतरची सर्वात मोठी राहिली. टक्केवारीत सेन्सेक्ससह निफ्टीही १.७० टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात वाढला. व्यवहारात निफ्टीचा प्रवास ७,७५३.५५ ते ७,८७३.६५ दरम्यान राहिला.

सेन्सेक्समध्ये दुचाकी वाहननिर्मितीतील आघाडीच्या बजाज ऑटोचा समभाग अग्रेसर राहिला. त्याला दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ३.७८ टक्के अधिक मूल्य प्राप्त झाले. सोबतच खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या समभाग मूल्यातही ३.४१ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली गेली. एचडीएफसी लिमिटेडचा समभागही ३.१२ टक्क्य़ांपर्यंत उसळला.

सिगारेट उत्पादन पुन्हा रुळावर आल्याने सेन्सेक्समधील आयटीसी २.३८ टक्क्य़ांनी वाढला, तर अक्षय्यतृतीयेमुळे होणाऱ्या सोनेखरेदीच्या जोरावर पी सी ज्वेलर्स, टायटन यांच्या समभाग मूल्यात अनुक्रमे १.०३ व ०.४१ टक्के वाढ झाली.
नफेखोरीने आयनॉक्स वाइंड ३ टक्क्य़ांनी वाढला. सत्रात तो तब्बल ८.२५ टक्क्य़ांनी उंचावला होता. कंपनीने गेल्या शुक्रवारी ७७ टक्के ढोबळ नफ्यातील वाढ नोंदविली होती.

एप्रिलमध्ये वाढलेल्या देशांतर्गत प्रवासी कारविक्रीनेही बाजारात चैतन्य निर्माण झाले. नव्या वाहनांच्या जोरावर तीन महिन्यांतील घसरणीनंतर यंदा वाहन उद्योगाने सकारात्मक कामगिरी बजाविली आहे. सेन्सेक्समधील केवळ चार समभागांचे मूल्य घसरले,

समभागनिगडित म्युच्युअल फंड गुंतवणूक पाच महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर
समभागनिगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एप्रिलमध्ये ४,४३८ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक रक्कम आहे. फंड प्रकारातील या पर्यायात किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात समभागनिगडित म्युच्युअल फंड योजनांमध्ये अधिक भर पडली आहे. मार्च २०१६ मध्ये १,३७० कोटी रुपये समभागनिगडित म्युच्युअल फंड योजनांमधून काढून घेण्यात आले होते. अस्थिर भांडवली बाजारामुळे हे घडले होते. यापूर्वी, डिसेंबर २०१५, जानेवारी २०१६ व फेब्रुवारी २०१६ मध्ये फंडांमध्ये अनुक्रमे ३,६४४, २,९१४, २,५२२ कोटी रुपये होते. एप्रिलमधील समभागनिगडित म्युच्युअल फंडांमध्ये यापूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वाधिक ६,३७९ कोटी रुपये गुंतविले गेले होते. एप्रिलमध्ये सेन्सेक्स १.०४ टक्क्यांनी वाढला होता.

उत्पन्न योजनांमधील मालमत्ता ६ लाख कोटींपल्याड
उत्पन्न फंड योजनांमधील मालमत्तेने एप्रिल २०१६ मध्ये ६ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. वार्षिक तुलनेत हे प्रमाण ६.४ टक्क्यांनी वाढले आहे. म्युच्युअल फंडांमधील विविध गुंतवणूक योजनांमध्ये उत्पन्न फंड योजनांमध्ये जवळपास एकूण फंड गुंतवणुकीच्या ४२ टक्के गुंतवणूक झाली आहे. एप्रिलमध्ये एकूण फंड गुंतवणूक प्रथमच ऐतिहासिक १४.२२ लाख कोटी रुपयांच्या (१५.३%) वर गेली आहे. तर उत्पन्न योजनांतील गुंतवणुकीची रक्कम ५.६४ कोटी रुपये झाली आहे.उत्पन्न योजनांबरोबर लिक्विड फंडातील एप्रिलमधील गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत प्रथमच सर्वाधिक, ३.३७ लाख कोटी रुपये झाली आहे. त्यात १.३४ लाख कोटी रुपयांची (६९ टक्के) भर पडली आहे.