|| प्रवीण देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराची खरेदी-विक्री असो किंवा शेअरचे व्यवहार असो, करदात्यांना अशा व्यवहारांच्या करपात्रतेसंबंधी प्रश्न पडतात. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी जाणून अशा व्यवहारांचे योग्य नियोजन केल्यास करदात्याची कर, व्याज आणि दंडापासून सुटका होऊ शकते, कायद्याचे अनुपालन वेळेवर शक्य होते. वाचक आपल्या प्रश्नांचे निरसन खाली दिलेल्या ई-मेल वर किंवा ‘लोकसत्ता अर्थ-वृत्तान्त’च्या  arthmanas@expressindia.Com  या ई-मेलवर प्रश्न पाठवून करू शकता.      

प्रश्न : माझ्या पत्नीने २६ एप्रिल १९९२ रोजी एक सदनिका २,७३,००० रुपयांना खरेदी केली होती. ही सदनिका २ ऑगस्ट २०२१ रोजी ६६,००,००० रुपयांना विकली. त्याचे पैसे बचत खात्यात ठेवले आहेत. या व्यवहारात ६६,००० रुपयांची दलाली दिली. दीर्घमुदतीचा भांडवली नफा कसा गणावा? त्यावर किती कर भरावा लागेल? कर वाचवण्यासाठी नवीन घरात किंवा रोख्यात गुंतवणूक किती मुदतीत करावयास हवी? बचत खात्यात ठेवलेल्या रक्कमेवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल का?

– प्रकाश, मुंबई</strong>

उत्तर : आपल्याला होणारा दीर्घमुदतीचा नफा गणण्यासाठी १ एप्रिल २००१ रोजीचे ‘वाजवी बाजारमूल्य’ किंवा त्या दिवशीच्या मुद्रांक शुल्कानुसार बाजारमूल्य, जे कमी आहे ते विचारात घ्यावे लागेल. या मूल्यावर महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन आलेले मूल्य आणि विक्री किंमत यामधील फरक हा दीर्घमुदतीचा भांडवली नफा किंवा तोटा असेल.

समजा १ एप्रिल २००१ रोजीचे मूल्य ५ लाख रुपये इतके आहे. त्यानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन आलेले मूल्य हे १५,८५,००० रुपये (५ लाख रुपये गुणिले ३१७ भागिले १००). २०२१-२२ या वर्षीचा महागाई निर्देशांक ३१७ आणि २००१-०२ या वर्षीचा १०० असा आहे. सदनिकेची विक्री किंमत ६६ लाख रुपये वजा ६६,००० रुपये दलाली अशी निव्वळ विक्री किंमत ६५,३४,००० रुपये असून दीर्घमुदतीचा भांडवली नफा ४९,४९,००० रुपये (६५,३४,००० रुपये वजा १५,८५,००० रुपये) होईल. आपल्याला कर भरावयाचा असेल तर या भांडवली नफ्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक कर) इतका कर भरावा लागेल.

आपल्याला कर वाचविण्यासाठी दोन पर्याय आहेत (१) नवीन घरात गुंतवणूक, किंवा (२) बॉण्डमध्ये गुंतवणूक. नवीन घरात गुंतवणूक करावयाची असेल तर ती पुढील दोन वर्षांत (नवीन घर विकत घेतल्यास) किंवा तीन वर्षांत (नवीन घर बांधल्यास) करावी लागेल. जर नवीन घरासाठी पैसे ३१ जुलै २०२२ (त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी) न गुंतविल्यास भांडवली नफ्याएवढी (म्हणजे ४९,४९,००० रुपये) रक्कम ‘कॅपिटल गेन स्कीम १९८८’नुसार बँकेत बचत किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपात नवीन खाते उघडून जमा करावी लागेल आणि या खात्यातून आपल्याला नवीन घर खरेदी किंवा बांधण्यासाठी खर्च करावा लागेल. वरील मुदतीत भांडवली नफ्याएवढय़ा रकमेची गुंतवणूक किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात केल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही. या मुदतीत नवीन घरात गुंतवणूक करू शकला नाहीत तर तीन वर्षांनंतर ही भांडवली नफ्याएवढी रक्कम आपल्या उत्पन्नात गणली जाईल आणि त्यावर कर भरावा लागेल. कॅपिटल गेन बॉण्डमध्ये ५० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक घराची विक्री केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत केल्यास कर भरावा लागणार नाही. कॅपिटल गेन स्कीम, बॉण्ड किंवा बचत खात्यावर मिळालेले व्याज हे करपात्र आहे.

प्रश्न : मी जुलै २०२१ मध्ये एक घर विकले. या विक्रीवर मला ३५ लाख रुपये दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. तसेच २०२१-२२ या वर्षांत शेअर्सच्या विक्रीतून तीन लाख रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला. हा तोटा मी घराच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यातून वजा करू शकतो का?

– हितेंद्र सावंत, डोंबिवली

उत्तर : अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा कोणत्याही संपत्तीच्या दीर्घ किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. त्यामुळे आपल्याला शेअर्सच्या विक्रीतून झालेला तोटा हा घराच्या विक्रीतून झालेल्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल.

प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. मी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कराच्या नवीन विकल्पानुसार कर (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर) भरला होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षांतसुद्धा मी कंपनीला नवीन विकल्पानुसार उद्गम कर कापण्याची सूचना दिली होती. मी या वर्षी नवीन घर खरेदी केले आहे आणि त्यासाठी मी गृहकर्जसुद्धा घेतले आहे. मी नवीन विकल्पानुसार कर भरल्यास मला या वजावटी घेता येणार नाहीत आणि मला जास्त कर भरावा लागेल. मी जुना विकल्प निवडू शकतो का? आणि कंपनीला तसे सूचित करून त्यानुसार उद्गम कर कापण्याची विनंती करू शकतो का?

– विजय सोलकर, ठाणे</strong>

उत्तर : आपल्या उत्पन्नात उद्योग- व्यवसायाचा समावेश नसल्यामुळे आपण प्रत्येक वर्षी आपला विकल्प  बदलू शकता. २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी जुना विकल्प (वजावटी घेऊन नियमित दराने कर भरण्याचा) निवडू शकता. आपण कंपनीला जो विकल्प सूचित केला आहे त्या विकल्पाप्रमाणेच कंपनी पूर्ण वर्ष उद्गम कर कापेल. परंतु आपला विकल्प आपण विवरणपत्र भरताना निवडू किंवा बदलू शकता. निवडलेल्या विकल्पानुसार कर देय असेल तर तो व्याजासकट आपल्याला भरावा लागेल किंवा कर परताव्याचा (रिफंड) दावा करावा लागेल.

प्रश्न : मी माझ्या मित्राला २,५०० अमेरिकन डॉलर भेट म्हणून देत आहे. तो अनिवासी भारतीय आहे आणि भारताबाहेर स्थायिक झाला आहे. या भेटीवर मला किंवा त्याला कर भरावा लागेल का?

– एक वाचक

उत्तर : ‘कलम ५६’नुसार ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेची भेट ही करपात्र आहे. आपण जी २,५०० अमेरिकन डॉलर (म्हणजे अंदाजे १,८४,००० रुपये) भेट देणार आहात ती मित्राला करपात्र आहे. पूर्वी ही रक्कम भारताबाहेरच्या खात्यात प्राप्त आणि जमा होत असल्याकारणाने करपात्र उत्पन्नात गणली जात नव्हती. २०१९ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार अशी भेट ही भारतात प्राप्त आणि जमा झाली असल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे अशी भेट मित्राला करपात्र आहे. शिवाय या भेटीवर आपल्याला ‘कलम १९५’नुसार उद्गम कर (टीडीएस)सुद्धा कापून सरकारकडे जमा करावा लागेल. यासाठी आपल्याला उद्गम कराचा नंबर (टॅन)सुद्धा घ्यावा लागेल. करदात्याने ज्या देशात पैसे पाठवायचे आहेत त्या देशाबरोबर झालेल्या ‘करविषयक करार’ (टॅक्स ट्रिटी)सुद्धा तपासून बघितला पाहिजे. ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी मात्र करमुक्त आहेत, जरी ही भेट अनिवासी भारतीयाला भारताबाहेर पाठविली असली तरी.

प्रश्न : मी विमा एजंट आहे. मला अनुमानित कराच्या तरतुदीनुसार कर भरता येईल का?

– विनोद परब, रत्नागिरी</strong>

उत्तर : ज्या करदात्यांच्या उत्पन्नात कमिशन किंवा ब्रोकरेज (दलाली) यांचा समावेश आहे त्या करदात्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.  त्यामुळे आपल्याला अनुमानित  कराच्या तरतुदीनुसार कर भरता येणार नाही.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invest in a new home buying and selling a home share transactions akp
First published on: 17-01-2022 at 00:06 IST