August Shivratri Date 2025 : मासिक शिवरात्री भगवान शिवाला समर्पित आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्रीचे व्रत करून महादेवाची पूजा केली जाते. पण, या महिन्यातील शिवरात्री शुभ मुहूर्तदेखील घेऊन आली आहे. श्रावणातल्या मासिक शिवरात्रीला कोणते योग तयार होतील आणि कोणते शुभ मुहूर्त असतील त्याचबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…
मासिक शिवरात्री कधी आहे? (Masik Shivratri Date)
पंचांगानुसार, मासिक शिवरात्रीचे व्रत कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला पाळले जाते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ४४ वाजता सुरू होईल आणि २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी संपेल. अशा परिस्थितीत मासिक शिवरात्री गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.
शुभ मुहूर्त (Masik Shivratri Shubh Muhurta)
मासिक शिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त ४४ मिनिटे असणार आहे. २१ ऑगस्ट रोजी शिवपूजेचा शुभ मुहूर्त रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून सुरू होईल, ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असणार आहे. श्रावणातील शिवरात्री पूजा जरी निश्चित काळात केली जात असली तरीही भद्रकाळ सोडून, पूजा दिवसभर कधीही केली जाऊ शकते.
तीन शुभ योग (Masik Shivratri Shubh Yog)
भाद्रपद शिवरात्रीला गुरुपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग व अमृत सिद्धी योग, असे अत्यंत तीन शुभ योग जुळून आले आहेत. हे तिन्ही योग श्रावणातल्या शिवरात्रीला पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत जुळून येतील. त्या दिवशी सकाळी ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग व वरियान योगसुद्धा जुळून येईल. त्याचबरोबर सकाळपासूनच पुष्य नक्षत्र जागृत आणि १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे.
शिवरात्रीला भद्राची छाया
भाद्रपद शिवरात्रीच्या दिवशी भद्रा दुपारी १२:४४ ते रात्री १२:१६ पर्यंत असणार आहे. तर, अशा परिस्थितीत भद्रा सुरू होण्यापूर्वी या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे टाळले पाहिजे.