Lakshmi Pujan 2025: दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन! धन, समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो. चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीची सर्व माहिती..

लक्ष्मीपूजन तारीख, तिथी

२० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी अमावास्या तिथी सुरू होणार असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार, लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल.

लक्ष्मीपूजन कसे करावे?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा कशी करावी, याविषयी लोकसत्ताने पंडित उदय मोरोणे यांच्या हवाल्याने माहिती जाणून घेतली. ते सांगतात, “लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार निरनिराळे आहेत. भाद्रपद शुक्ल पक्षांत, अश्विन शुक्ल पक्षांत आणि कृष्ण अमावास्येस. या तीन प्रकारांपैकी पहिले दोन्ही प्रकार प्रत्येक घरीच होत असतात. परंतु तिसऱ्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त “व्यापारे वसते लक्ष्मीः” या न्यायाने व्यापारी वर्गच आपल्या दुकानांतून, पेढींत, ऑफिसांत वैगरे सार्वजनिक उत्सवपद्धतीने करीत असतो.”

कोणत्या दिशेला पूजा मांडावी

दिवाळीच्या दिवशी पूजा करताना दिशेचे विशेष भान ठेवावे. असे मानले जाते की पूजा नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेलाच करावी. संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सर्व सदस्यांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. तसेच, पूजा करताना या गोष्टीचीही काळजी घ्या की पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे.

लक्ष्मी पूजनात या गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. तसेच, देवीच्या पूजनात श्रीयंत्र, कौडी आणि गोमती चक्र अवश्य ठेवावे. त्यानंतर, प्रदोष काळात शुभ मुहूर्तावर विधी-विधानाने माता लक्ष्मीची पूजा व आरती करावी.

घरी लक्ष्मीपूजन कसे करावे?

सुरूवातीला चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल कापड टाकावा. त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा. त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी. तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा. त्या विड्यावर नारळ ठेवावे. सुरूवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी. शेवटी मनोभावे आरती करावी.

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे. लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)