Budh Gochar November 2025 Negative Zodiac Impact: ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध २३ नोव्हेंबर रोजी शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी घडणार असून, बुध ६ डिसेंबरपर्यंत रात्री ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत तूळ राशीत भ्रमण करणार आहे. या काळात काही राशींना संवाद, वाणी, व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंधांच्या क्षेत्रात बदल जाणवू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा थेट संबंध वाणी आणि बुद्धिमत्तेशी असतो, त्यामुळे या गोचराचा परिणाम विशेषतः संवाद आणि निर्णयक्षमता यावर दिसू शकतो. काही राशींना याचा नकारात्मक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे काही राशींसाठी हा काळ थोडा कठीण जाऊ शकतो. मग कोणत्या राशींना या काळात सावध राहण्याची आवश्यकता आहे, चला पाहूयात…
या ३ राशींनी घ्यावी विशेष काळजी
१. वृषभ
बुधाचा हा गोचर वृषभ राशीच्या सहाव्या भावावर म्हणजेच आरोग्य, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्रावर परिणाम करणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष टाळा; हलका ताण, थकवा किंवा जुन्या त्रासात वाढ जाणवू शकते. वाढलेल्या खर्चामुळे तुमचा बँक बॅलन्स बिघडू शकतो. पत्नीसोबतचे नाते थोडे बिघडू शकते.
२. वृश्चिक
हा गोचर वृश्चिक राशीच्या बाराव्या भावात होणार आहे, ज्याचा संबंध खर्च, मानसिक स्थिती आणि आत्मचिंतनाशी असतो. या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, म्हणून पैशांचा वापर जपून करा. व्यवसायातही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिमा डागाळली जाऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी किरकोळ मतभेदामुळे मोठा संघर्ष होऊ शकतो.
३. मीन
मीन राशीसाठी बुधाचा हा गोचर आठव्या भावावर प्रभाव टाकेल. हा भाव परिवर्तन, गुप्त गोष्टी आणि भागीदारीशी संबंधित आहे. त्यामुळे या काळात गुंतवणूक, कर्ज किंवा संयुक्त मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. या काळात कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्यासाठीही पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे.
बुधाचा शुक्राच्या राशीत प्रवेश हा काही राशींना संवाद आणि विचारशक्तीमध्ये सुधारणा देईल, तर काहींना आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत सावधगिरी आवश्यक ठरेल. हा काळ योग्य निर्णय, संयम आणि संवाद कौशल्याने पार केला तर बुधाचा गोचरही नवीन शिकवण आणि अनुभव देऊन जाईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
