Raksha Bandhan 2025 Puja Vidhi, Muhurat, Timings:  श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांची रेलचेल आणि त्यातला सर्वात भावनिक सण रक्षाबंधन. बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला रक्षणसूत्राचा धागा हा केवळ प्रेमाचा नाही, तर आयुष्यभराच्या संरक्षणाच्या वचनाचा साक्षीदार असतो. भारतभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. पण, यंदाचं रक्षाबंधन खास आहे, कारण तब्बल बारा वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे, ज्यामुळे या सणाचं महत्त्व अनेक पटींनी वाढणार आहे.

कधी आहे रक्षाबंधन २०२५?

बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. वैदिक पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:११ वाजता होईल आणि समाप्ती ९ ऑगस्ट रोजी दुपारी १:२३ वाजता होईल. उदय तिथीच्या नियमानुसार रक्षाबंधन सण ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जाईल.

भद्रायोगाचा वेळ

९ ऑगस्टच्या पहाटे १:५२ वाजता भद्रा संपेल. म्हणजेच सकाळपासूनच राखी बांधण्याचा शुभारंभ होईल आणि दिवसभर भाऊ-बहिणींच्या प्रेमाच्या धाग्यांनी रंगून जाईल.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता?

आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे, त्याची भरभराट व्हावी यासाठी रक्षाबंधनाला बहिणी देवाकडे प्रार्थना करतात आणि असं म्हणतात की, या पवित्र दिवशी देवसुद्धा बहिणीचं ऐकतो. हे जर खरे असेल तर शुभ मुहूर्तावर आपण भावाला राखी बांधल्यास हे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी ५:४७ पासून दुपारी १:२४ पर्यंत राहील, म्हणजे तब्बल ७ तास ३७ मिनिटांचा शुभ काळ लाभेल.

राखी बांधण्याची पारंपरिक पद्धत

रक्षाबंधनाच्या दिवशी थाळीत चंदन, अक्षता, दही, रक्षणसूत्र आणि भावाला आवडणारी मिठाई सजवावी. तुपाचा दिवा प्रज्वलित करून प्रथम श्रीकृष्णाला राखी बांधावी. त्यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे, तिलक लावून रक्षणसूत्र बांधावे आणि आरती करावी. रक्षणसूत्रानंतर पालक आणि गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत.

यंदाच्या रक्षाबंधनाला गजलक्ष्मी राजयोगाची शुभ ऊर्जा आणि भद्रा संपल्यानंतरचा अखंड शुभ काळ लाभणार आहे. त्यामुळे २०२५ चं हे रक्षाबंधन भावा-बहिणींसाठी केवळ खासच नाही, तर लक्षात राहील असं ठरणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)