Rare Planetary Combinations 2025: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. भक्तांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि श्रद्धेचा सोहळा. रिद्धी-सिद्धीचे दाता, विघ्नहर्ता गणपती बाप्पा जेव्हा घराघरांत विराजमान होतात, तेव्हा केवळ भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, तर घरात सुख, शांती आणि समृद्धीचाही वर्षाव होतो. या वर्षी बाप्पांचे आगमन २७ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे आणि यावेळी काही ग्रहांचे दुर्मीळ योग तयार होत असल्याने हा गणेशोत्सव खास ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक शुभ आणि प्रभावी योग तयार होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाची सांगड घातली जाईल, जी बाप्पांच्या आगमनाचा शुभ संकेत मानली जाते. त्याच वेळी सूर्य आणि केतूची युती काही राशींना विशेष लाभ देईल. चंद्र आणि मंगळाची युती लक्ष्मी योग निर्माण करेल, जो धनवृद्धी आणि समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
या दहा दिवसांत रोज नवनवे शुभ योग तयार होत राहतील –
२८ ऑगस्ट : रवि योग आणि शुक्ल योग
२९ ऑगस्ट : ब्रह्म योग आणि रवि योग
३० ऑगस्ट : इंद्र योग, त्रिपुष्कर योग, तसेच बुध-सूर्याची युती होऊन बुधादित्य योग
१ ते ६ सप्टेंबर : दररोज सौभाग्य, शोभन, प्रीति, आयुष्मान असे योग आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीही प्रबळ रवि योग.
ज्योतिषांच्या मते, हे ग्रहसंयोग काही राशींच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणतील. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते…
तूळ
या वर्षीचा गणेशोत्सव तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा दरवाजा उघडेल. जीवनात अनेक क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. करिअरमध्ये मोठी झेप, व्यावसायिक प्रयत्नांना यश आणि आर्थिक अडचणींवर मात हे सर्व शक्य आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. बाप्पांच्या कृपेने अविवाहितांसाठी विवाहयोगही संभवतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदी प्रसंग येऊ शकतात.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा सण अतिशय लाभदायक ठरू शकतो. आयुष्यातील अडथळे दूर होतील. मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन संधी, आर्थिक समस्यांचे निराकरण आणि वडिलांशी नातेसंबंध अधिक मजबूत होतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात प्रगतीची मोठी शक्यता आहे. तसेच घराचे नूतनीकरण किंवा नवीन घर बांधण्याचा योगही निर्माण होऊ शकतो.
थोडक्यात, बाप्पांच्या आगमनासोबत या दहा दिवसांचा शुभ कालखंड ‘त्या’ भाग्यवान राशींसाठी आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
