Shani Sadesati: ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. ही साडेसाती खूप अडचणी निर्माण करते, कष्ट करवून घेते, त्रासदायक असते, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे शनीच्या साडेसातीला अनेक जण घाबरतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा १२ व्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. ही साडेसाती अडीच वर्षांच्या तीन टप्प्यांमध्ये असते. म्हणजेच एकूण साडेसात वर्षे असते. म्हणून तिला साडेसाती, असे म्हटले जाते. म्हणजेच शनी एखाद्या राशीत प्रवेश करण्याआधीची अडीच वर्षे, त्या राशीत प्रवेश केल्यानंतरची अडीच वर्षे आणि त्या राशीतून पुढच्या राशीत गेल्यानंतरची अडीच वर्षे, असा शनीच्या साडेसातीचा प्रभाव त्या राशीवर असतो. सध्या शनीची साडेसाती १२ राशींपैकी तीन राशींवर सुरू आहे.

‘या’ राशींवर शनीची साडेसाती सुरूच

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा २४ जानेवारी २०२० रोजी सुरू झाला होता, यावेळी शनी कुंभाच्या आधीच्या मकर राशीत होता. त्यानंतर २४ जानेवारी २०२२ मध्ये शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. तिथे कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला त्यानंतर २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. तेव्हापासून कुंभ राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. कुंभ राशीची ही साडेसाती ३ जून २०२७ रोजी संपणार आहे. तोपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कष्टदायक असेल. या काळात तुम्ही जे काही चांगले कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

मीन (Meen Rashi)

२४ जानेवारी २०२२ मध्ये शनीने कुंभ राशीत प्रवेश केला, तेव्हापासून मीन राशीच्या साडेसातीची सुरूवात झाली. हा काळ मीन राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा होता. त्यानंतर २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. तेव्हापासून मीन राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा साडेसातीमधील अत्यंत महत्वाचा आणि त्रासदायक असतो. ३ जून २०२७ रोजी शनी मीन मधून मेष राशीत प्रवेश करेल. त्यावेळी तुमच्या राशीसाठी साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल, जो ८ ऑगस्ट २०२९ पर्यंत असेल. त्यानंतर मीन राशीची साडेसाती संपेल. तोपर्यंत प्रत्येक काम मन लावून करा, कोणाच्याही परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका.

मेष (Mesh Rashi)

२९ मार्च २०२५ पासून मेष राशीच्या साडेसातीला सुरूवात झाली असून सध्या मेष राशीच्या साडेसातीचा पहिला
टप्पा सुरू आहे. ३ जून २०२७ रोजी शनी मीन मधून मेष राशीत प्रवेश करेल. त्यावेळी तुमच्या राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल, जो ८ ऑगस्ट २०२९ पर्यंत असेल. त्यानंतर मेष राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल, जो ३१ मे २०३२ पर्यंत या राशीत राहील. हे वर्ष मेष रासीच्या व्यक्तींसाठी खूप कठीण ठरू शकतो. परंतु मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)