Shardiya Navaratri 2025: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते, तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, वाघ किंवा सिंहाला देवीचे वाहन मानले जाते. अनेक पौराणिक ग्रंथ, मालिका, चित्रपट, फोटो आणि मूर्त्यांमध्येही वाघ किंवा सिंहाला देवीचे वाहन म्हणून पाहिले आहे. परंतु, नवरात्रीच्या काळात जेव्हा देवीचे आगमन होते त्यावेळी देवीचे वाहन बदलते असे म्हणतात. नवरात्रीत देवी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, शिवाय देवी ज्या वाहनावर स्वार होऊन येते, त्या वाहनानुसार येणारे वर्ष कसे जाणार याचा अंदाज वर्तवला जातो.देवी भागवतमधील वर्णन केलेल्या श्लोकात याचे वर्णन केलेले आहे.

शशिसूर्ये गजारूढ़ा शनिभौमे तुरंगमे।
गुरौ शुक्रे चदोलायां बुधे नौका प्रकी‌र्त्तिता ।।

देवीची वाहने आणि त्यामागील अर्थ

नवरात्रामध्ये देवी विविध वाहनांवर बसून येते. यामध्ये घोडा, म्हैस, पालखी, मानव, होडी आणि हत्ती यांचा समावेश असतो. शास्त्रानुसार, या प्रत्येक वाहनामागे काही संकेत आहेत. उदाहरणार्थ जेव्हा देवी होडीतून किंवा हत्तीवरून आगमन करते तेव्हा संपूर्ण वर्ष पाऊस उत्तम होणार असे मानले जाते; तर जेव्हा देवी घोड्यावरून आगमन करते तेव्हा युद्धाचे संकेत असल्याचे मानतात. पालखीतून येणारी देवी महासाथींचे संकेत घेऊन येते असाही समज आहे.

वारानुसार निश्चित आहे देवीचे वाहन

देवी कोणत्या वाहनावरून येणार आहे हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या वारानुसार निश्चित केले जाते. ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी किंवा सोमवारी येतो, त्यावेळी देवी हत्तीवर बसून येते. ज्यावेळी नवरात्र मंगळवारी किंवा शनिवारी येते त्यावेळी देवी घोड्यावरून येते. तसेच ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवार किंवा शुक्रवारी असतो त्यावेळी देवी डोलीमध्ये बसून येते. बुधवारी आलेल्या नवरात्रीत देवी बोटीवर बसून येते. नवरात्रीमध्ये देवी कोणत्या वाहनावर बसून येते यामुळे येणारे वर्ष शुभ असेल की अशुभ याचा अनुमान लावला जातो. यंदा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोमवार असल्याने देवी हत्तीवर बसून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ संकेत आहेत. हत्ती हा गणरायचं म्हणजेच साक्षात बुद्धीच्या व कलेच्या देवतेचं प्रतीक आहे, त्यामुळे हत्तीवरून येणारी देवी आपल्या भक्तांच्या आयुष्यात ज्ञान व समृद्धीचं वाण घेऊन येते अशी श्रद्धा असते.

(टीप : वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.)