Vijayadashami Dasara 2024 Date : गणेशोत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस माँ दुर्गेच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात. देवीच्या नऊ रुपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा, गरबा, कन्यापूजा, जागरता आदी नऊ दिवस केले जातात. यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात मातेची उपासना केल्याने सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यंदा शारदीय नवरात्रीची तिथी काय आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शारदीय नवरात्री २०२४ तारीख आणि शुभ मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.

शारदीय नवरात्रीचे महत्व

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रुपात पृथ्वीवर असते, त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

पूजा कोणत्या दिवशी होणार?

३ ऑक्टोबर, गुरुवार – माता शैलपुत्रीची पूजा
४ ऑक्टोबर शुक्रवार – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.
५ ऑक्टोबर शनिवार – चंद्रघंटा मातेची पूजा
६ ऑक्टोबर रविवार – कुष्मांडा मातेचे पूजन
७ ऑक्टोबर सोमवार – आई स्कंदमातेची पूजा
८ ऑक्टोबर मंगळवार – कात्यायनी मातेची पूजा
९ ऑक्टोबर बुधवार – माँ कालरात्रीची पूजा
१० ऑक्टोबर गुरुवार – माँ सिद्धिदात्रीची उपासना
११ ऑक्टोबर शुक्रवार – माँ महागौरीची पूजा
१२ ऑक्टोबर शनिवार – विजयादशमी (दसरा)

महाराष्ट्रातही माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात.

घटस्थापना केव्हा केली जाते?

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत. या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते, अशी माहिती गुरुजी अवधूत शेंबेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri 2024 start date end date kalash sthapana shubha muhurat durga ashtami maha navami puja vidhi pujan samagri sjr