Shravan 2025 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना पूजा-विधींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते. या पूजेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख, समृद्धी नांदते आणि भगवान शंकरांचे विशेष आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. यात श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये श्रावण वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो.

श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात; पण तुम्हाला माहिती आहे का, यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती श्रावणी सोमवार आहेत? आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू होतोय?

यंदा २५ जुलै २०२५ ( शुक्रवार) पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. जो २३ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल. या महिन्यातील सोमवारला श्रावणी सोमवार म्हणतात. कित्येक शिवभक्त या दिवशी भगवान महादेवाची विधीवत पूजा करतात. या महिन्यात चार श्रावणी सोमवार आले आहेत.

श्रावणी सोमवार कधी?

पहिला सोमवार – २८ जुलै २०२५
दुसरा सोमवार – ४ ऑगस्ट २०२५
तिसरा सोमवार ११ ऑगस्ट २०२५
चौथा सोमवार – १८ ऑगस्ट २०२५

पंडित उदय मोरोणे यांच्या माहितीनुसार, खाली सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमूठ वाहिली जाते. “पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहिले जातात. दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहिले जातात. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहिले जातात. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहिले जातात. लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करावे लागते. श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचण्यास महत्त्व दिले जाते. जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा अध्याय वाचू शकता.