बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते. त्यामुळेच भाजप नेत्यांनाही बारामतीला जावे लागत आहे, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. भाजप सरकारने आमचा विश्वासघात केला. आम्ही मंत्रिपदाची भीक कधी मागितली नाही. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीतही शेट्टी यांनी वर्तविले.
एका परिषदेनिमित्त शेट्टी परभणीत आले होते. पत्रकार बठकीत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश कापुरे, जिल्हाध्यक्ष माणिक कदम उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, की सगळेच पुढारी बारामतीला जात आहेत. ज्या बारामतीतील २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा होतो, जेथे टोप्या घालण्याचा सल्ला मिळतो! जमिनी कशा हडप करायच्या याचे प्रशिक्षण मिळते. अशा बारामतीत जाण्याची भाजपात स्पर्धा लागली आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी या वेळी केला. कोटय़वधींचा सिंचन घोटाळा करणारे, सहकारी बँका, साखर कारखाने बुडवणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. सर्वच पक्षांत पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोर आहेत. मात्र, त्यांना सोडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव सरकार रचत आहे, असेही त्यांनी सांगितले.
झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही. भाजप सरकारने आमचा विश्वासघात केला. काँग्रेस आघाडी सरकार घालवायला १५ वष्रे लागली. मात्र, या सरकारला दोन वष्रेही लागणार नाहीत. या सरकारला जास्त दिवस राहायचे नाही म्हणूनच असे वागत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताआड येत असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरणारच. आम्ही काही सरकारचे गुलाम नाही. शेतकऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याआधी आमच्या अंगावर फिरवावे लागेल. कृषी विद्यापीठ ग्रामस्थांवर अन्याय करीत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न कायम असताना कोणाच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना-भाजपने आमचा वापर केला. पण आम्ही दुबळे नाहीत आणि कधी त्यांच्याकडे मंत्रिपदाची भीकही मागितली नाही. सरकारच्या निर्णयप्रक्रियेत आम्ही कुठेच सहभागी नसून आम्ही त्यांना केवळ निवडून आणले आहे. तत्कालीन आघाडी सरकारला अहंकार होता. त्या सरकारची धोरणेही चुकीची होती. हे सरकार त्याच धोरणांची री ओढत असेल, तर हे सरकारसुद्धा जास्त काळ टिकणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी कृषी विद्यापीठातील शेंद्रा येथील प्रकल्पग्रस्तांनी सुरूकेलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
‘सरकारची ग्रामस्थांवर दादागिरी’
सरकारमधील पुढारी कायद्याचा धाक दाखवून दादागिरी करीत जमिनी बळकावत आहेत. ज्या जमिनीची गरज कृषी विद्यापीठाला नाही, परंतु पालकमंत्र्यांना का, असा सवाल शेट्टी यांनी केला. पुढारी पोसण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. येथील काही दीडदमडीचे पुढारी प्रकल्पग्रस्तांना पाच-पन्नास हजारांत नियुक्त्या आणून देण्याचे आश्वासन देत आहेत, असा आरोप करीत नाव न घेता भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. ज्यांनी गावावर संकट आणले, तेही संकटात सापडतील. शेंद्रा ग्रामस्थ आता एकटे नसून राज्यातील स्वाभिमानीचे सर्व कार्यकत्रे या लढय़ात सहभागी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुपकर यांनी जीव गेला तरी गाव न सोडण्याचे आवाहन या वेळी केले.
कृषी विद्यापीठातील शेंद्रा गावामधील जमीन संपादित करण्याच्या हालचाली विद्यापीठाने सुरूकेल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी शेंद्रा गावी प्रकल्पग्रस्त शेतकरी हक्क परिषद घेतली. या वेळी शेट्टी, खोत बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, उपाध्यक्ष प्रकाश कापुरे, सरपंच किशोर ढगे, रसिका ढगे यांच्यासह मराठवाडय़ातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘भाजपकडून विश्वासघात; हे सरकार टिकणार नाही!’
बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते.
First published on: 09-02-2016 at 03:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp betrayed raju shetty